| महाड | प्रतिनिधी |
महाड एमआयडीसी परीसरात गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, महिलांवर अत्याचार, विनयभंग, चोरी, जबरी चोरी अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत. दरम्यान, सवाने गावच्या परिसरातील युनिलॅब केमिकल अँड फार्मासुटिकल्स कंपनीमधील मेजानाईन फोरम मधील जिन्याखाली ठेवण्यात आलेली कोपर आर्मड केबल चोरीला गेली आहे. कंपनीतील अधिकारी सतीश गुळवे यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी कंपनीतील मेजानाईन फोरम येथील जिन्याखालील दरवाजा मधून आत प्रवेश करून सुमारे 25 हजार रुपये किमतीचा कॉपर आर्मड केबल वायरचा बंडल लंपास केला आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि फॉरेन्सिक टीम दाखल होऊन महाड एमआयडीसी पोलिसांनी या चोरीच्या घटनेचा पंचनामा केला आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरट्यांनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राहुल मोहिते या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.







