कस्टम बॉन्डेड वेअरहाऊसमधून मालाची चोरी

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

विनायक नायडूसह त्याच्या साथीदारांचा शोध सुरू

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यात अनेक ठिकाणी चोऱ्यांचे सत्र सुरु असून नुकताच एक चोरीची घटना समोर आली आहे. उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदरात आयात झालेल्या व कस्टम विभागाने पुढील कारवाईसाठी भोम गाव येथील सुयश लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सुयश कमोडिटीजच्या वेअरहाऊसमध्ये पुढील कारवाईसाठी ठेवलेल्या कंटेनरमधील तब्बल 70 लाख 31 हजार रुपये किमतीच्या मालाची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे.

उरण पोलिसांनी या चोरी प्रकरणात सहभागी असलेल्या विनायक नायडू आणि त्याच्या इतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
पियुष अग्रवाल (53) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, द प्रेमिसो, ध्रुवा इंटरनॅशनल आणि एन. एम. शाह कॉर्पोरेशन या तीन कंपन्यांनी आयात केलेला माल कस्टम विभागाने तपासणीसाठी जप्त केला होता. हा माल सुयश लॉजिस्टिक्सच्या वेअरहाऊसमध्ये ठेवण्यात आला होता. मात्र, 14 मे 2025 ते 16 फेब्रुवारी 2026 या कालावधीत विनायक नायडू आणि त्याच्या इतर साथीदारांनी या वेअरहाऊसमध्ये प्रवेश करून या मालाची चोरी केली. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

या चोरट्यांनी तीन वेगवेगळ्या बिल ऑफ एन्ट्रीनुसार या मालावर डल्ला मारला आहे, ज्यात प्रामुख्याने ट्रॉली, ब्रेसलेट, पोर्टेबल शिलाई मशीन, शूज व सॉक्स, चिकटपट्टी, वेस्ट बॅग, सफाई संच, कॉफी कप, ब्रँडेड शूज (नायके, ऍडिडास, ऍसिक्स), अंडरगारमेंट आणि लहान मुलांच्या बॅगा व प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या, मुलांच्या स्कूल बॅग, चुंबक, पेन्सिल पाऊच असा एकूण 70 लाख 31 हजार रुपयांचा माल चोरला आहे. उरण पोलीस ठाण्याचे व.पो.नि. हनिफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. अभिजीत देशमुख या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Exit mobile version