। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील पेण व माणगाव येथून तीन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. 2 लाख 11 हजार रुपये किंमत या दुचाकींची असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात भुरट्या चोरट्यांनी डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे.
पेण परिसरातील बोरगाव रोडे येथील लक्ष्मी अपार्टमेंट येथील इमारतीजवळ फिर्यादीने त्याची दुचाकी (एमएच-06-सीसी-9867) दि.8 एप्रिल रोजी रात्रीच्यावेळी पार्कींग केली होती. एकूण 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्याने गायब केली असून याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच पेण बाजारपेठेतील दिनेश शहा यांच्या दुकानासमोर फिर्यादीने त्याची दुचाकी टीव्हीएस ज्युपीटर (एमएच-06-सीए-0132) दि.15 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पार्कींग केली होती. एकूण 75 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे.
माणगावमधील शिगवण यांच्या बंगल्यासमोर असलेली 1 लाख 11 हजार रुपये किंमतीची होन्डा शाईन दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक श्रीराम मोरे करीत आहेत.