| पनवेल | वार्ताहर |
नवीन पनवेल येथे लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका बँक व्यवस्थापकाची बॅग दुचाकीवरील दुकलीने चोरी केल्याची घटना मध्यरात्री घडली. या घटनेची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अद्याप या प्रकरणातील चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही.
भांडूप येथे राहणारे 36 वर्षीय बँक व्यवस्थापक हे मध्यरात्री कोप्रोली गावात जात होते. त्याच मार्गावरून स्कूटीवरून दोन मुले जात असल्याचे बँक व्यवस्थापकाला दिसल्याने त्याने त्या स्कूटीचालकाला हात दाखवून स्कूटी थांबवली. कोप्रोली गावात जाण्यासाठी एवढ्या रात्री कोणतेच वाहन मिळत नसल्याने त्यांनी लिफ्ट मिळेल का, असे विचारल्यावर स्कूटीवरील मुले लिफ्ट देण्यासाठी तयार झाली. दुसर्या व्यक्तीने बँक व्यवस्थापकाला मागे बसायला सांगून त्यांच्या हातातली बॅग पकडतो, तुम्ही नीट बसा असे सांगून ती बॅग स्वतःकडे ठेवली. आणि बँक व्यवस्थापक स्कूटीवर बसण्याच्या आत स्कूटी दामटवून ही दुकली तेथून फरार झाली. याप्रकरणी स्कूटी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.







