| नवी मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीचे सरकार सत्तेवर असले तरी नवी मुंबई महापालिकेत मात्र हे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत गणेश नाईक विरुद्ध शिंदेची शिवसेना असा सामना रंगला असतानाच, गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेवर टीका केली आहे. भाजपाने परवानगी दिली तर एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करून घोडेपण बेपत्ता करेन, असे खुले आव्हान गणेश नाईक यांनी शिंदे यांना दिले आहे.
नवी मुंबईत शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. वनमंत्री गणेश नाईक आणि शिंदे सेनेचे नेते यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप तसेच टीकाटिप्पणी सुरू आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने शहरात सुरू केलेल्या ‘नवी मुंबई, नवं सरकार’ या प्रचाराला ‘नवी मुंबईकरांसाठी जुनं तेच सोनं’ असल्याचे जोरदार प्रत्युत्तर भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले.
ठाणे हा कोणाचाही बालेकिल्ला नाही. केंद्रीय नेतृत्वाने रोखले नसते आणि माझ्याकडे जबाबदारी दिली असती तर संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय चित्र पालटून दाखविले असते, असा दावाही नाईक यांनी यावेळी केला होता. गेल्या पाच वर्षांत प्रशासकीय कालावधीत नवी मुंबईला लुटणाऱ्यांना येथील मतदार घरचा रस्ता दाखवतील, असेही नाईक यावेळी म्हणाले.
गणेश नाईक यांनी केलेल्या विधानामुळे शिंदेच्या सेनेत अस्वस्थता पसरली असतानाच, गणेश नाईक यांनी आता पुन्हा शिंदेंवर टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी माझे काहीही वैयक्तिक मतभेद नाही. पण एकनाथ शिंदे नेहमी म्हणातात, ‘मला हलक्यात घेऊन नका, टांगा पलटी घोडे फरार करेन’ पण तुम्ही गणेश नाईकांना हलक्यात घेतले ना, तुमच्या आधी मी येथे तीन वेळा ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. तुमच्या सुपुत्राच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावांचा नवी मुंबईत सामावेश करताना मंत्रालयात बैठक बोलावली. त्यात आम्हाला विचारलेदेखील नाही. हा प्रस्ताव पूर्वी मीच मांडला होता. पण, त्यात काहीतरी अटी होत्या. गणेश नाईकांना हलक्यात घेतला ना आणि भाजपने मला परवानगी दिली तर एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटी करून घोडे फरार नाही तर बेपत्ता करुन टाकेन, असे नाईक म्हणाले.







