जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
| जालना | प्रतिनिधी |
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौर्यावर असताना त्यांनी मराठा आंदोलनाला हिणवले होते. अशी अनेक आंदोलने आम्ही हाताळली आहेत, असे वक्तव्यही त्यांनी केले होते. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी, मराठ्यांच्या नादी लागू नका, नाही तर तुमचा राजकीय एन्काऊंटर करु, असा थेट इशारा अमित शाह यांना दिला आहे. तसेच तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिले तर सत्ता मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. मराठ्यांच्या पाठिंब्याशिवाय कोणतेही सरकार स्थापन होणे शक्य नसल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाबाबत आपण जाहीरपण सांगतो की, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांना आरक्षण द्यावेच लागणार आहे. धनगरचा जीआर सरकार काढणार असेल तर मराठा आणि कुणबीदेखाील एकच आहे, हा जीआर निघायला सरकारची काहीच हरकत नसावी. सरकार दुजाभाव करू शकत नाही. याबाबतचा अध्यादेश निवडणुकीआधीच काढावा लागणार आहे. मराठ्यांच्या पाठिंब्याशिवाय कोणीही सत्ता स्थापन करू शकत नाही, असेही जरांगे म्हणाले. आरक्षण हा राजकीय आणि वादाचा मुद्दा नाही. ही समस्या सोडवण्यासाठी सामंजस्य आणि मनाचा मोठेपणा लागतो. माणुसकीचा विचार मनात असला पाहिजे, असेही जरांगे म्हणाले.
जरांगे पुढे म्हणाले की, अमित शाह शिर्डीला आले होते, तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं होतं की, मराठा आरक्षणावर बोला. पण, ते काहीही बोलले नाही. पण साहेब तुम्ही मराठ्यांच्या नादी लागू नका. आम्ही तुम्हाला सांगतो, तुम्ही पटेल आंदोलन कसं हाताळलं? तुम्ही गुर्जर आंदोलन कसं हाताळलं? तसंच मराठ्यांचं आंदोलन हाताळणार का? आम्ही देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहांना सांगतो की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावंच लागणार आहे. निवडणुकीच्या आधी अध्यादेश काढावा लागणार आहे. तुमची आंदोलन हाताळण्याची पद्धत मला चांगली माहिती आहे. जर तुम्हाला वाटत असेल मराठ्यांना बाजूला ठेवून हे आंदोलन हाताळू, तर अमित शाहांची ही घोडचूक असेल, असा इशारासह जरांगे यांनी दिला.