पाली-उद्धर रस्त्याची चाळण; प्रवासी, ग्रामस्थ मेटाकुटीला


। पाली/बेणसे । वार्ताहर ।
विकासाचा मार्ग रस्त्यातुन जातो, असे म्हणतात, पण सुधागड तालुक्यातील रस्ते पाहुन विकास म्हणजे काय रे भाऊ, असं म्हणण्याची वेळ आली आहे. पाली ते उद्धर मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ व प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. या मार्गावर मोठ्या आकाराचे असंख्य खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने खड्डे दिसत नाही. परिणामी वाहन चालकांना वाहन चालवितांना कसरत करावी लागते. शिवाय या खड्ड्यांत वाहने जोरात आदळतात त्यामुळे अपघाताचा धोकासुद्धा आहे.

हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. काही वर्षांपूर्वी या मार्गाचे नूतनीकरण झाले होते. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे व सततच्या चालणार्‍या अवजड वाहनांमुळे रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. या मार्गावरून प्रवास करणार्‍यांना तलावातून वाहन चालवण्याचा अनुभव येत आहे.


तारेवरची कसरत
या मार्गावरून प्रवास करताना दुचाकी, मिनिडोअर, छोटी वाहने या वाहनांच्या चालकांना तारेवरची कसरत करीत वाहन चालवावे लागते. वाहनातून प्रवास करताना वयोवृद्ध नागरिक, आजारी व्यक्ती, गरोदर महिला आदींना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकर हा मार्ग सुस्थितीत करावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.

उन्हेरे फाटा ते उद्धर या रस्त्याच्या कामाला या वर्षी सुरुवात झाली आहे. परंतु रस्त्याचे काम मे अखेरीस गेल्याने पावसामुळे काम अर्धवट थांबविण्यात आले. पाऊस कमी झाला की लवकर रस्त्याचे काम पुन्हा चालू करण्यात येईल. उन्हेरे फाटा ते उद्धर दरम्यान पडलेले खड्डे लवकर भरून रस्ता सुस्थितीत करण्यात येईल.

-दिलीप मदने, शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, पाली


Exit mobile version