भारतीय भूविज्ञान विभागमार्फत लवकरच सर्वेक्षण करणार
I रायगड I खास प्रतिनिधी I
महाड तालुक्यातील कसबे शिवथर येथील भूगर्भातून मोठमोठे आवाज येत आहेत. त्या परिसराचे भूशास्त्रीय प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले आहे.सखोल सर्वेक्षण भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण विभागमार्फत लवकरच करण्यात येणार आहे. या आवाजामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
वरिष्ठ भूवैज्ञानिक भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या प्राथमिक अहवाल नुसार पृथ्वीच्या निर्मीतीच्या वेळी ज्या खडकांची निर्मिती झाली, त्या निर्मीतीच्या वेळी सदर खडकांच्या प्रस्तरामध्ये हवेची पोकळी निर्माण होऊन पोकळीमध्ये कालांतराने हवेची जागा जर पावसाच्या पाण्यामुळे उभ्या व आडव्या सांध्यामध्ये (फटी किंवा भेगा ) भरल्याकारणाने हवेच्या व पाण्याच्या दाबामुळे आवाजाची निर्मीती होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे कळविले आहे. तरी सदर भागाचे सखोल सर्वेक्षण व अभ्यास भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण विभाग, पुणे यांच्याकडुन करणे संयुक्तिक ठरेल, असा अहवाल देखील जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे.
सदर संस्थेकडून लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच अतिवृष्टी होत असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.