मुख्यमंत्र्यासाठी बनवलेल्या रस्त्यावर खड्डेच खड्डे

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातून कर्जत खोपोली हा रस्ता पुण्याकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग समजला जातो. बहुसंख्य ठिकाणी काँक्रीटचा असलेल्या या रस्त्यावर अल्प ठिकाणी डांबरी रस्ता आहे. या रस्त्यावर केळवली परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रात्रीच्या वेळी या रस्त्याने प्रवास करणे धोकादायक बनले आहे. याच रस्त्याने राज्याचे मुख्यमंत्री कर्जत येथे आले होते आणि त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे वाहनांसाठी हा रस्ता डांबरी केला होता.

कर्जत तालुक्यातून पुण्याकडे जाणारी वाहने कर्जत खोपोली रस्त्याने जात असतात. त्यात ठाणे जिल्ह्यातील वाहने आणि नाशिक जिल्ह्यातून येणारी वाहनेदेखील अलिबाग-पेण आणि कोकणात जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. मात्र, या रस्त्यावरील डांबरी भाग सध्या धोकादायक बनला आहे. रात्रीच्या वेळी तर या रस्त्याने वाहतूक करणार्‍या दुचाकी वाहनधारक यांच्यासाठी हा रास्ता धोकादायक बनला आहे. रस्त्यावर मोठं मोठे खड्डे बनले असून रात्रीच्या वेळी वाहने रस्त्यातून जाताना हेड लाईटमुळे दुचाकी धारकांचा अपघात होत आहेत. याच रस्त्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जानेवारी महिन्यात कर्जत शहारत आले होते. त्यावेळी कर्जत खोपोली रस्त्याची डागडुगी करण्यात आली होती. तर, डांबरी भाग नव्याने तयार करण्यात आला होता. आता त्याच डांबरी रस्त्याने भीषणरूप धारण केले असून दुचाकी यांच्यासाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे.

Exit mobile version