| अलिबाग | प्रतिनिधी |
राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. दि.5 फेब्रवारी रोजी निवडणूका पार पडणार आहेत. दरम्यान, देशात दुबार मतदारांवरून रणकंदन वाजले असतानाच रायगड जिल्हा परिषदेत हजारो मतदारांची नावे संभाव्य दुबार यादीत आली आहेत. तत्पुर्वी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीतील नावांमध्ये पुनरावृत्ती झालेल्या नोंदी तपासून कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीएलओंमार्फत तातडीने त्याची पडताळणी आली. त्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात 36 हजार 528 दुबार नावे मतदार यादीत आढळली आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजल्याने स्थानिक पातळीवर राजकीय रणधुमाळी सुरू झाली असली, तरी मतदार यादीतील दुबार नावांचा ताण आहे. निवडणूक आयोगाने सर्व जिल्हा परिषदांमधील संभाव्य दुबार मतदारांची यादी पाठवली आहे. निवडणुकीपूर्वी त्यांची पडताळणी करून एकाच मतदारसंघात एकाच केंद्रावर त्यांनी मतदान करावे, यासाठी यंत्रणा राबवण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. यादी त्या त्या भागातील बीएलओंना दिली जाईल. बीएलओ गृहभेटीद्वारे मतदारांची पडताळणी करतील. त्यांना कोणत्याही एका मतदार संघातील, एका केंद्रावर मतदान करता येईल. तो मतदारसंघ आणि केंद्र कोणता असेल याची निवड मतदाराने करायची आहे. त्यानुसार मतदाराकडून तसा अर्ज भरून घेण्यात येणार आहे.
दुबार मतदारांसाठी असणारे पर्याय
दोन किंवा त्यापेक्षा जास्त मतदारसंघात मतदार यादीत नाव असेल किंवा एकाच मतदारसंघात दोन-तीन मतदान केंद्रांवर नाव असेल, तर त्यांना त्यापैकी एकाच केंद्राची निवड करावी लागणार आहे. जर या पर्यायाला मतदाराकडून प्रतिसाद नसेल, तर मतदार यादीतील नावापुढे दुबारचा शिक्का लागणार आहे. संबंधित दुबार मतदार मतदानासाठी एका केंद्रावर आला असता त्याठिकाणी त्यांचे ‘मी या केंद्रावर मतदान करत असून, अन्य केंद्रांवर मतदान करणार नाही', असे हमी पत्र लिहून घेतले जाणार आहे.
तालुका : संभाव्य दुबार मतदार
अलिबाग : 2,282
मुरुड : 882
पेण : 6,606
पनवेल : 7,126
उरण : 4,750
कर्जत : 3,098
खालापूर : 282
माणगाव : 3,223
तळा : 465
रोहा : 2,037
सुधागड : 980
महाड : 2,653
पोलादपूर : 890
श्रीवर्धन : 717
म्हसळा : 537
एकूण : 36,528





