वाढत्या थंडीच्या लाटेमुळे भाजी काढणीस विलंब
| ठाणे | प्रतिनिधी |
यंदा परतीचा पाऊस लांबल्यामुळे भाज्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होऊन त्यांचे उत्पादन घटले होते. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा भाज्यांच्या पिकाची लागवड करण्यात आली. परंतु, सध्या राज्यात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. हे वातावरण भाज्यांच्या वाढीस पूरक नसल्यामुळे भाजी काढणीसाठी तयार होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे बाजारात काही भाज्यांची आवक घटली असून, त्यांच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे.
नवी मुंबई येथील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे, जुन्नर, नगर, सातारा, बारामती अशा विविध जिल्ह्यांतून भाज्या दाखल होतात. या बाजार समितीतून या भाज्या ठाणे, मुंबई तसेच उपनगरातील किरकोळ बाजारात विक्रीसाठी जातात. नियमित बाजार समितीत अंदाजे 550 ते 600 भाज्यांच्या गाड्या दाखल होत असतात. गेले काही दिवसांपासून बाजार समितीत दुधी भोपळा, गवार, कोबी, दोडका, वांगी, शेवगा या भाज्यांची आवक घटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ झाली आहे. परिणामी, किरकोळ बाजारातही या भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
सध्या राज्यात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. हे वातावरण काही भाज्यांच्या वाढीसाठी पूरक नसल्यामुळे या भाज्यांची वाढ होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे भाज्यांचे उत्पादन घटल्याची माहिती नवी मुंबईचे घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब बडदे यांनी दिली.
सध्या मोठ्या प्रमाणात शेतमाल हा स्थानिक बाजारात विक्री केला जात आहे. त्यामुळे बाजार समितीत भाज्यांची आवक घटल्याची माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी बाजारचे उपसचिव मारुती पबितवार यांनी दिली.