‌‘108′ आजारी; रुग्णांची होतेय हेळसांड

रुग्णवाहिकेमध्ये बिघाड होण्याच्या प्रकारात वाढ

| अलिबाग | प्रमोद जाधव |

ग्रामीण भागातील रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी गेल्या नऊ वर्षांपूर्वी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका सुरु करण्यात आली. परंतु, या रुग्णवाहिकेमध्ये बिघाड होण्याचे प्रकार वाढत आहे. दर दिवशी सात ते आठ रुग्णवाहिकांची दुरुस्ती केली जात आहे. त्यामुळे 108 रुग्णवाहिका आजारी असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्हा किंवा तालुक्याच्या रुग्णालयात नेताना पूर्वी फार मोठी अडचण निर्माण होत असत. रुग्णवाहिकांचा अभाव निर्माण होत असल्याने अनेकवेळा रुग्ण रस्त्यात दगावण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात होती. रस्ते अपघातात जखमी झालेले, नैसर्गिक आपत्तीत सापडलेले, गंभीर आजाराने त्रस्त असलेले रुग्ण अशा वेगवेगळ्या कारणांमुळे प्रकृती बिघाडलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावे यासाठी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका गेल्या नऊ वर्षांपूर्वी सुरु करण्यात आली. रुग्णावर तातडीने उपचार व्हावे यासाठी सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेखाली 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांमार्फत तातडीची वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न केला. ही सेवा 2014 पासून सुरु झाली.

रायगड जिल्ह्यासाठी शासनाकडून 23 रुग्णवाहिका देण्यात आल्या. या रुग्णवाहिकांमध्ये अन्य आरोग्य सुविधांसह डॉक्टरही उपलब्ध करण्यात आले. 108 क्रमांकावर संपर्क साधल्यास काही मिनिटांत रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना रुग्णालयात उपचाराठी नेण्याचे काम केले जाते. बीव्हीजी कंपनीद्वारे या रुग्णवाहिकांवर नियंत्रण ठेवले जात असून, रायगड जिल्ह्यात या कंपनीचा एक व्यवस्थापक म्हणून काम पाहात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये 108 रुग्णवाहिकांचे कामकाज चालत आहे. दर दिवशी रुग्णवाहिका सुमारे दोनशे किलोमीटरचा प्रवास करीत आहेत. त्यात मुंबईला रुग्णांना नेणे, जिल्हा, उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविणे, अशा अनेक प्रकारची कामे रुग्णवाहिकेच्या मदतीने केली जात आहेत.

परंतु, जिल्ह्यातील 108 क्रमांकाच्या काही रुग्णवाहिकांची अवस्था बिकट झाली आहे. दर दिवशी रुग्णवाहिका बंद होण्याचे प्रकार वाढले आहेत. सतत या रुग्णवाहिकांमध्ये बिघाड होत आहे. एका दिवसाला पाच ते सात रुग्णवाहिकांमध्ये बिघाड होत आहे. महाडपासून अलिबाग, माथेरान, रेवदंडा, कळंबोली, माणगाव, पनवेल अशा भागातील सहा रुग्णवाहिकांमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे. त्यात इंजिन बंद पडणे, स्टेअरिंगची समस्या निर्माण होणे, असे अनेक प्रश्न रुग्णवाहिकेबाबत सुरु झाले आहेत.

महाराष्ट्राची जीवनदायी समजल्या जाणाऱ्या जिल्ह्ययातील 23 रुग्णवाहिकांपैकी काही रुग्णवाहिका नादुरुस्त अवस्थेत आहेत. तर, काही रुग्णवाहिका बंद अवस्थेत असून, काहींमध्ये डॉक्टरचा अभाव आहे. त्यामुळे मुंबई, पुणे व अन्य ठिकाणी उपचारासाठी नेणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहे. रुग्णवाहिका बिघाडाचा त्रास सर्वसामान्य रुग्णांना होऊ लागला आहे. 108 रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत रुग्णांना रुग्णालयातच वाट पहावी लागत आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या रुग्णवाहिका जुन्या झाल्या असून, आतापर्यंत या रुग्णवाहिकांनी साडेतीन लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे. त्यामुळे लवकरच या रुग्णवाहिका भंगारात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या नऊ वर्षांपासून 108 रुग्णवाहिका काम करीत आहे. दर दिवशी दोनशे किलोमीटर रुग्णवाहिका धावतात. अलिबागसह अन्य भागात रुग्णवाहिका जात आहेत. ग्रामीण भागात तळागाळात रुग्णवाहिका धावत असल्याने बिघाड होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख किलोमीटरचा प्रवास रुग्णवाहिकेमार्फत केला आहे.

प्रदीप चिलुका, व्यवस्थापक, 108 रुग्णवाहिका
Exit mobile version