बाजारात भगव्या ध्वजांसह तिरंगा खरेदीची लगबग

| पनवेल | वार्ताहर |

श्रीराम मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा व आगामी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पनवेलमधील बाजारपेठा तिरंग्यात तसेच भगव्या ध्वजासह न्हाऊन निघाल्या आहेत. पनवेल क्षेत्रातील सिग्नल तसेच बाजारपेठेत झेंडे, टी शर्ट, दुपट्टा, कुर्ती, खादीचे कपडे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. ते खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरु आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा भगव्या ध्वजासह तिरंगा व खादीचे कपडे यांच्या मागणीत वाढ झाली असल्याचे दुकानदारांनी सांगितले. तीन वर्षांपूर्वी कोरोनाचे सावट व शासनाचे असणारे निर्बंध यामुळे प्रजासत्ताक दिन मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला होता. पण, आता निर्बंधमुक्त वातावरणात सण सुरू असून, शाळाही पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. तसेच श्री राममंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा येत्या 22 जानेवारीला संपन्न होत असून या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पनवेलकर उत्स्फूर्त असून त्यानिमित्ताने विविध राजकीय पक्षांतर्फे विविध कार्यक्रम, भजने, मंदिरांमध्ये रामनामाचा जप, तसेच अनेकांनी आपल्या घराच्या मुख्य दरवाजा आणि खिडकीमध्ये भगवे ध्वज उभारले आहेत. त्याच प्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळा सोसायटीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्यामुळे अनेकांचा कल खादीचे कपडे, वुलनचे जॅकेट, टी शर्ट घेण्याकडे असल्याचे दुकानदारांनी स्पष्ट केले.

Exit mobile version