कोलाड-रोहा मार्गावर बसथांबा नाही

विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे अतोनात हाल

| गोवे-कोलाड, |वार्ताहर |

कोलाड-रोहा मार्गावरील कै. दत्ताजीराव ग. तटकरे चौकात बसथांबा नसल्यामुळे ऊन, वारा, पावसात या मार्गाने प्रवास करणारे विद्यार्थी, आबालवृद्ध व इतर प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. या प्रवाशांना जवळ असणाऱ्या व्यावसायिकांच्या दुकानांचा आधार घवा लागत आहे.

कोलाड-रोहा मार्गाच्या रुंदीकरणात या मार्गांवर असणाऱ्या बसथांब्याची तोडफोड करण्यात आली. परंतु, या रस्त्याचे काम एक वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. परंतु, येथे आवश्यक असणाऱ्या बसथांब्याची अद्याप ही उभारणी करण्यात आली नाही, यामुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशीवर्गाला त्रास सहन करावा लागत आहे.
कोलाड हे ठिकाण प्रवाशांच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण असून, येथून रोह्याकडे जाण्यासाठी या परिसरातील 65 ते 70 वाड्या, वस्त्या, खेडेगावातील नागरिक प्रवास करीत असतात. शिवाय, कोलाड येथे कै. द.ग. तटकरे माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज असल्यामुळे येथे रोह्यापासून असंख्य विद्यार्थी ये-जा करीत असतात; परंतु येथे बसथांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

विद्यार्थ्यांना कमी दरात मिळणारा एसटी पास, महिलांना एसटीचे अर्धा तिकीट, ज्येष्ठ नागरिकांना एसटी भाड्यात मिळणारी सवलत यामुळे हे सर्व प्रवासी एसटीने प्रवास करीत असतात, मग एसटीला कितीही उशीर झाला तरी ते एसटीची वाट पाहात व्यावसायिकांच्या दुकानात उभे राहतात. अशा वेळी एसटी आली तर सर्व विद्यार्थी एसटी पकडण्यासाठी मागे-पुढे न बघता धावत सुटतात. यामुळे मागून येणाऱ्या वाहनांमुळे मोठा अपघात होऊ शकतो. यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन बसथांबा बांधण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Exit mobile version