नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
चीनी कंपन्यांनी अलिकडील काळात देशातल्या महामार्ग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली नसल्याची माहिती केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
गतवर्षी चीनने लडाखमध्ये भारताला धोका दिला होता. तेव्हापासून भारत आणि चीन यांच्यातील तणाव शिगेला पोहोचलेला आहे. चीनी कंपन्यांना महामार्ग प्रकल्पांमध्ये परवानगी दिली जाणार नाही, असे गडकरी यांनी गेल्यावर्षीच्या जुलैमध्ये स्पष्ट केले होते. जॉईंट व्हेंचरच्या माध्यमातून जे महामार्ग प्रकल्प बहाल केले जातात, त्यातही चीनी कंपन्यांना आम्ही मनाई केलेली आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने निर्यातीला जास्तीत जास्त चालना दिली जात असून आयात कमी करण्यावर सरकारने भर दिला आहे. प्रदूषणमुक्त इंधन म्हणून हायड्रोजन इंधनाकडे आम्ही पाहत आहोत, असे गडकरी यांनी सांगितले.