उरणमधील प्रकल्पांचे फायर ऑडिटच नाही

धोक्याचा इशारा, कंपन्यांचे दुर्लक्ष
अग्निरोधक यंत्रणेचा वणवा

| उरण | वार्ताहर |

उरणमध्ये प्रत्यक्षात परिस्थिती भयानक आहे. येथील प्रकल्पांपैकीं हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच अधिकृत आहेत व इतर अनधिकृत आहेत. त्यात अनेक प्रकल्पांचे हे स्ट्रक्चरल व फायर ऑडिट गेली अनेक वर्षे झालेलीच नसल्याची धक्कादायक माहिती अधिकृत सूत्राकडून समजते. त्यामुळे उरणमधील जनता जरी सुखरुप वाटत असली तरी आजच्या घडीला उरण हे गॅसचा फुगा बनला आहे. तो कधी फुटेल याचा नेम नाही. उरण तालुका हा तेलजन्य अतिज्वलनशील पदार्थांची साठवणूक करणारा आहे. त्यातील हाताच्या बोटावर मोजण्या इतपत प्रकल्पांकडे अग्निरोधक यंत्रणा आहे. तर इतर प्रकल्पांकडे अनेक सुविधांचा वणवा दिसत असतानाही येथील शासकीय यंत्रणा त्यांची पाठराखण करण्यात धन्यता मानत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.


काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील पावणे औद्योगिक विभागात लागलेल्या आगीचा भडका उडून येथील रसायनिक कंपन्यातील संपूर्ण परिसराला याचा फटका बसला होता. ही आग अग्नी सुरक्षेच्या कमतरतेमुळे पसरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नवी मुंबईपेक्षा उरण परिसरात तेल व अतिज्वलनशील पदार्थाचासाठा होत असतो. त्यामुळे आगीच्या घटना उरणमध्येही घडताना दिसत आहेत. त्यामुळे उरणमधील अग्नी सुरक्षा व त्यातील त्रुटी दूर करण्याची मागणी केली जात आहे.


उरणच्या ओएनजीसी, बीपीसीएल, जेएनपीटी, डीपी वर्ल्ड, सिंगापूर बंदर, वीज प्रकल्पसह अनेक अनधिकृत कंटेनर यार्ड कार्यरत आहेत. या प्रकल्पात पेट्रोल, डिझेल, वायू, केमिकल तसेच नाफ्तासारखे अतिज्वलनशील पदार्थाची लाखो मेट्रीक लिटरची साठवणूक व वाहिन्यांमार्फत वाहतूकही केली जात आहे. त्यासाठी उरणमधील अनेक भागांतून या तेल व तेलजन्य पदार्थ वाहतूक करणार्या जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. या तेल व तेलजन्य पदार्थाच्या वाहिन्यांवर अनेक ठिकाणी अतिक्रमण व भंगार माफियांनी बस्तान बसविले आहे. त्यामुळे आगीचा धोका जास्त आहे. आग विझविण्यासाठी लागणारे साहित्य हाताच्या बोटावर मोजण्या इतपत प्रकल्प सोडले तर अनेक प्रकल्पांमध्ये याची उणीव प्रामुख्याने जाणवते. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळेच उरणकरांची सुरक्षा धोक्यात आली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Exit mobile version