एसटी संपावर तोडगा नाही; न्यायालयात 20 डिसेंबरला सुनावणी

| मुंबई | प्रतिनिधी |
विलिनीकरणाच्या मुद्यावरुन गेले दोन आठवडे संपावर गेलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नांवर आवश्यक तो तोडगा अद्याप न निघाल्याने हा संप आता तातडीने मिटणे अशक्य झालेले आहे.उच्च न्यायालयातही सुनावणी झाली खरी, पण त्यावर कोणताही ठोस निर्णय झाला नाही.पुढील सुनावणी 20 डिसेंबरला होणार आहे.दरम्यान, या संपावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत परिवहन मंत्री अ‍ॅड.अनिल परब यांनी सुमारे चार तास चर्चा केली.पण त्या बैठकीतही कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. उच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी याबाबत महत्त्वाचे निर्देश दिले. मराज्य सरकारनं नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीनं इतर संघटनांच्या प्रतिनिधींचंही म्हणणं ऐकून 20 डिसेंबर रोजी प्राथमिक अहवाल द्यावा,फ अशा सूचना न्यायालयानं दिल्या. विलिनीकरण ही मागणी कामगारांनी ठामपणे लावून धरली आहे. तर, त्यावर लगेचच कुठलाही निर्णय घेता येणार नाही. समितीच्या अहवालाची वाट पाहावी, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. त्याच अनुषंगानं न्यायालयानं 20 डिसेंबरपर्यंत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.


उपलब्ध मनुष्यबळ वापरा
मएसटी संप सुरू असल्यानं ग्रामीण भागातील विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. विद्यार्थ्यांना कोरोनाच्या संकटामुळं आधीच दीड वर्षापासून प्रभावी शिक्षणापासून वंचित राहावं लागलं आहे, त्यांचं आणखी नुकसान होता कामा नये. त्यामुळं उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे एसटी बससेवा सुरू राहायला हवी, असं मत खंडपीठानं व्यक्त केलं.

एसटी महामंडळाचे शंभर टक्के कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळं कोणीही कामावर रुजू होणार नाही, असा दावा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेतर्फे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला. त्यावर, एसटीचे जे चालक आणि वाहक काम करायला येण्यास इच्छुक असतील त्यांना कोणीही अडवू नये आणि महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी हिंसक मार्गाचा अवलंब करू नये. कोणीही हिंसक आंदोलन केल्यास त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे व न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिल्या.

पवार -परब बैठक निष्फळ
दुसरीकडे आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. तब्बल तीन तास ही बैठक चालली. या बैठकीमध्ये परब यांची एसटी संपासंदर्भात शरद पवारांशी चर्चा झाली.

अनिल परब म्हणाले की, गेले काही दिवस एसटीचा संप सुरु आहे त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यासंदर्भातच शरद पवारांनी मला आणि अधिकार्‍यांना बोलावलं होतं. त्यांनी सगळी परिस्थिती समजून घेतली. या संपावर काय तोडगा निघू शकतो, याबाबत त्यांनी तपासणी केली. संप मिटवण्यासाठी महामंडळाची आर्थिक परिस्थिती आणि संपकरी कामगारांच्या मागण्या यासंदर्भात त्यांनी सविस्तर चर्चा केली. सखोल चर्चा झाली आणि वेगवेगळे पर्याय कशापद्धतीने तयार करता येतील आणि मार्ग काढता येईल, यावर चर्चा झाली.

Exit mobile version