क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार नाही

जसप्रीत बुमराहची चाहत्यांसमोर कबुली

| मुंबई | वृत्‍तसंस्था |

विश्वचषक विजेत्या भारतीय संघाच्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी गुरुवारी (दि.4) वानखेडे स्टेडियमवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर खेळाडूंना मंचावर बोलावून सन्मानित करण्यात आले. दरम्यान टी-20 विश्वचषक 2024 मध्ये स्पर्धेचा मालिकावीर ठरलेल्या जसप्रीत बुमराहने निवृत्तीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या तीन दिग्गज खेळाडूंनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. ज्यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. त्यानंतर आता बुमराहही निवृत्तीबद्दल स्पष्ट बोलला आहे. बुमराह म्हणाला की, सध्या टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा त्याचा कोणताही विचार नाही, ही फक्त त्याची सुरुवात आहे. त्यांला अजून पुढे जायचे आहे. जसप्रीत बुमराह म्हणतो की मी सहसा कधी रडत नाही पण हा विजय अविश्वसनीय होता. माझ्या मुलाला पाहिल्यानंतर माझ्या मनात ज्या भावना उमटल्या त्या खूपच आश्चर्यकारक होत्या. यानंतर मला माझे अश्रू आवरता आले नाहीत.

टी-20 विश्वचषक2024 मध्ये भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अप्रतिम गोलंदाजी केली. भारतीय संघाला जेव्हा जेव्हा प्रतिस्पर्धी फलंदाज बाद होण्याची गरज भासली तेव्हा बुमराहने संघाला बळी मिळवून दिला. या स्पर्धेत बुमराहने 4.17 च्या सरासरीसह 15 फलंदाज बाद केले. भारताला चॅम्पियन बनवण्यात जसप्रीत बुमराहचा मोठा वाटा आहे. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे बुमराहला स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही निवडण्यात आले.

Exit mobile version