केंद्राकडून पुरेसा लसपुरवठा नाही

20 लाख नागरिक मात्रेच्या प्रतीक्षेत, सरकारचा न्यायालयात दावा
। मुंबई । वृत्तसंस्था ।
केंद्र सरकारकडून अद्यापही पुरेसा लस पुरवठा उपलब्ध होत नसून 20 लाख नागरिक दुसर्‍या मात्रेच्या प्रतीक्षेत असल्याचा दावा राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात केला. पहाटेपासून रांगा लावूनही नागरिकांना लस मिळत नसल्याचा आणि कोविन अपद्वारे केल्या जाणार्‍या लस नोंदणीत त्रुटी असल्याचा आरोप करणार्‍या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. त्या वेळी आतापर्यंत 11.23 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यातील 3.35 कोटी नागरिकांनी लशीची पहिली, तर 1.5 कोटी नागरिकांनी दोन्ही मात्रा घेतल्याची माहिती राज्य सरकारतर्फे न्यायालयाला देण्यात आली. त्यावर लशीचा अद्यापही तुटवडा असल्याबाबत मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारकडे विचारणा केली. तेव्हा केंद्र सरकारकडून अद्यापही कमी लशींचा अपुरा साठा उपलब्ध होत आहे. दिवसाला पाच ते सात लाख कुप्याच उपलब्ध के ल्या जातात. परिणामी 20 लाख नागरिक दुसर्‍या मात्रेच्या प्रतीक्षेत असल्याचे सरकारतर्फे न्यायालयाला सांगितले. या नागरिकांना लशीची दुसरी मात्रा देणे महत्त्वाचे असून लसीकरणात त्यांना प्राधान्य दिला जात असल्याचा दावाही राज्य सरकारने केला.दरम्यान, केंद्र सरकारने मात्र राज्य सरकारच्या दाव्याचे खंडन केले. तसेच केंद्र सरकारकडून प्रत्येक राज्याला पुरेसा पुरवठा केला जात असल्याचा दावा केला.

Exit mobile version