सुधागडात पशुधन वार्‍यावर

डॉक्टर, अधिकारी व कर्मचार्‍यांची वानवा

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यात पशुसंवर्धन विभागात डॉक्टर, अधिकारी व कर्मचार्‍यांची वानवा आहे. विविध मंजूर 15 पदांपैकी तब्बल 10 पदे रिक्त आहेत. चिंतेची बाब म्हणजे, पशुधन विकास अधिकार्‍यांच्या चारपैकी चारही जागा रिक्त आहेत. अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे उपलब्ध कर्मचार्‍यांवर कामाचा अतिरिक्त ताणदेखील येत आहे.

सुधागड तालुका डोंगराळबहुल तालुका असून, 100 महसूल गावे आहेत. गावासह येथील वाड्यांमध्ये बहुसंख्य लोकांकडे गुरांचा गोठा आहे. याशिवाय अनेक जण शेळी, मेंढ्या, कोंबड्या आदींचे पालन करतात. मात्र, पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, वर्णोपचारक, परिचर अशी अनेक पदे रिक्त असल्याने अशा परिस्थितीत या सर्व जनावरांवर व प्राण्यांवर योग्य प्रकारे उपचार व लसीकरण करता येत नाही. तर अनेक गुरे योग्य व वेळीच उपचार न मिळाल्याने दगावली आहेत. यासंदर्भात अनेकदा शेतकरी संघटनेने आवाज उठवला होता. परंतु, त्याची आजतगायत दखल घेतली गेलेली नाही.

रिक्त पदे
पशु विकास अधिकारी - मंजूर 4 पदांपैकी 4 रिक्त
पशुधन पर्यवेक्षक - मंजूर 4 पैकी 2 रिक्त
वर्णोपचारक - मंजूर 1 पैकी 1 रिक्त
परिचर - मंजूर 6 पदांपैकी 3 पदे रिक्त
एकूण रिक्त पदे = 10

रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. काही महिन्यात त्याची मंजुरी मिळून डॉक्टर व इतर कर्मचारी दाखल होतील.

लता मोहिते,
गटविकास अधिकारी

पशुधन विकास अधिकारी नसल्याने पशुधन व पाळीव प्राण्यांवर योग्य प्रकारे उपचार होत नाही, त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पशुधन विभागातील योजना मिळण्यातदेखील अडचणी येतात. त्यामुळे लवकर पशुधन विकास अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करण्यात यावेत.

शरद गोळे,
शेतकरी, शिळोशी
Exit mobile version