आयसीआयसीआय बँकेचा चालढकलपणा
| उरण | वार्ताहर |
तालुक्यातील अनेक गावांमध्ये 18 जुलै 2023 रोजी पुराचे पाणी शिरुन रहिवासी शेतकऱ्यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंबरोबर भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. मात्र, नुकसानभरपाईची रक्कम शासनाकडून आयसीआयसीआय बँकेत जमा होऊनही बँकेकडून ती देण्यास चालढकलपणा होत असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
उरण तालुक्यातील चिरनेर, चिर्ले, विंधणे, दिघोडे, वेश्वी, जासई, कळंबुसरे, कोप्रोली, खोपटा, वशेणी, सारडे, करळ, सोनारी, पागोटे, नवघर, भेंडखळ, बोकडविरा, नागाव, चाणजे, केगाव, जसखारसारख्या इतर ग्रामपंचायतींच्या हद्दीतील अनेक रहिवासी शेतकऱ्यांच्या घरात 18 जुलै 2023 रोजी पुराचे पाणी गेल्याने जीवनावश्यक वस्तूंबरोबर भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावेळी नुकसानग्रस्तांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्या माध्यमातून शासनस्तरावर सातत्याने करण्यात आली होती. शासनाने सदर मागणीची दखल घेऊन आयसीआयसीआय बँकेकडे नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात आली आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकांनी काही नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, उर्वरित गावोगावच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यास चालढकल करीत आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये बँकेच्या ढिसाळ कारभाराबद्दल संतापाची लाट उसळत आहे.
आज जवळपास सात महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यामुळे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्याकडे भरपाई मिळावी यासाठी सातत्याने मागणी केली आहे. भरपाई मिळाली नाही तर शेतकरी आंदोलन उभारतील.
प्रीतम म्हात्रे, नुकसानग्रस्त रहिवासी, सारडे ग्रामपंचायत
तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई लवकरात लवकर द्यावी, यासंदर्भात आयसीआयसीआय बँक जेएनपीए उरण शाखेला आदेश दिले आहेत.
डॉ. उद्धव कदम, तहसीलदार
आयसीआयसीआय बँकेकडे नुकसानभरपाईची रक्कम शासनाकडून जमा झाली असून, त्याचे वितरण करण्यात येत आहे.
आयसीआयसीआय बँक, जेएनपीए उरण







