म्हसळ्यात पाणी टंचाईच्या झळा

शासकीय योजनेंत प्रचंड भ्रष्टाचार

। म्हसळा । वार्ताहर ।

म्हसळा तालुका 12 ते 15 वर्षांपूर्वी टँकरमुक्त झाला आहे. म्हसळा शहराला 30 वर्षाच्या कालावधीत पाणी पुरवठ्याच्या सुमारे 100 कोटी रुपयांच्या योजना होऊन सुद्धा आज म्हसळाकरांचे तोंडचे पाणी पळाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. आता नव्याने महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत म्हसळा शहरासाठी 43 कोटी रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यापूर्वी झालेल्या विविध योजनेंत प्रचंड भ्रष्टाचार झाला असून अनेक कामे निकृष्ट दर्जाची आहेत.

म्हसळा नगरपंचायतीने शहरांतील काही नागरी वस्तीचे भागांत विंधण विहीरी खोदल्या असून त्यातून त्या भागांतील नागरिकांना पंपाव्दारे पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये म्हसळा दिघीरोड, नवानगर परिसरात 7 ते 8 ठीकाणी, तर साने-दातार आळी आणि हरीजन वस्तींत एक ठीकाणी विंधण विहीरींमार्फत पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे त्या भागातील नागरिकांना पाणी टंचाईपासून थोडा दिलासा मिळत आहे. भविष्यात ब्राह्मण आळी, तांबट आळी, सोनार आळी, कन्या शाळा परिसर, उमरोटकर-बोरकर वस्ती, मातोश्री पार्क या परिसरांत किमान 7-8 विंधण विहीरी खोदून परिसरांत पर्यायी सोय करावी, आशी मागणी पुढे येत आहे.

पाभरे येथून सुरु असलेल्या योजनेतील दोनही पंपात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे म्हसळाकरांना केवळ एकवेळ अपुरे, गढूळ पिण्यास आयोग्य असे पाणी मिळत आहे. पाणी सोडणे आणि पंप देखभाल दुरुस्तीसाठी ठेका पद्धतीने काम दिले आहे. अटी नियमानुसार सबधीताच्या अनास्थेमुळे आणि पंपाची पर्यायी सोय नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईला तोड द्यावे लागत आहे. शहरांत अनेक भागांत कृत्रिम पाणी टंचाई होत आसल्याने पाण्यासाठी महिला कधीही रस्त्यावर येऊ शकतात, असे वातावरण झाले आहे. तर दुसरीकडे म्हसळा नगरपंचायतीच्या 7 विहीरी, खाजगी 6 विहीरी, नगरपंचायतीच्या 9 ते 10 विंधण विहीरी आणि शहरात 87 खाजगी विंधण विहीरी पाणी टंचाईची तिव्रता कमी करीत आहेत.

Exit mobile version