किनाऱ्यांचे सुरक्षितता ऑडिट व्हावे; स्थानिकांसह पर्यटकांकडून मागणी


| मुरूड जंजिरा | वृत्तसंस्था |

कोकणाला 720 किलोमीटरचा विशाल आणि निसर्गरम्य सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. काही वर्षांपासून सिंधुदुर्ग पासून रत्नागिरी, रायगड, पालघर पर्यंतच्या कोकण समुद्रपट्टी परिसरात या किनाऱ्यावर पर्यटन वाढले आहे. दोन-तीन वर्षांपासून शालेय सहलीची संख्या वाढली असून, आताही डिसेंबरपासून शालेय सहलींचा मोठा ओघ सुरु झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पर्यटन उद्योगाला प्राधान्य देताना किनाऱ्यांवर दुर्घटना होऊ नये यासाठी आता राज्य शासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. किनाऱ्यावर पर्यटकांच्या सेवेसाठी असणारी सुरक्षितता साधने, मनुष्यबळ, दक्षता, जबाबदारी, कर्तव्ये याबाबत अंमलबजावणीसाठी कठोर ऑडिट करणे काळाची गरज आहे, असे स्थानिकांसह पर्यटकांकडून बोलले जात आहे.

मुरूड, काशीद परिसरातील अनुभवी आणि बुजुर्ग मंडळींनी सांगितले की, हा निर्भेळ आनंद लुटताना मागील काही वर्षांपूर्वी आणि आताही विद्यार्थी आणि पर्यटक बुडून मृत्युमुखी पडल्याच्या दुर्घटनादेखील घडलेल्या आहेत. प्रत्येक समुद्रकिनारा त्याची खोली आणि अंतर्गत घडामोडी वेगवेगळ्या असतात. येणाऱ्या पर्यटकांनी, सहल आयोजकांनी देखील समुद्रातील भरती-ओहोटीचे नियम प्रथम समजावून घ्यावेत. स्थानिकांन कडून धोक्यांच्या ठिकाणांची माहिती समजावून घेणे गरजेचे आहे. दहा-पंधरा दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्यातील देवगड समुद्रकिनाऱ्यावर पुण्याच्या पाच विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. त्याआधी काही वर्षांपूर्वी मुरूड समुद्रकिनाऱ्यावर पुण्यातील इनामदार कॉलेज मधील13 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. याबाबत येथील मच्छिमार सांगतात की, स्थानिकांना समुद्रातील धोके माहीत असल्याने त्यांच्यावर असे दुर्घटनेचे प्रसंग आलेले नाहीत. जेव्हा आपण अपरिचित समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी किंवा भेट देण्यासाठी जातो, त्यावेळेस तेथील परिस्थिती लक्षात घ्यायला हवी.

जीवरक्षकांची संख्या कमी; वेतनदेखील तुटपुंजे
समुद्रकिनारी शालेय सहली आणि येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षकांची संख्या तुटपुंजे वेतन मिळत असल्याने कमी आहे. यासाठी शासनाकडून अनुदान मिळत नसल्याने ग्रामपंचायत अथवा नगरपरिषदेला वेतन देणे परवडत नाही. किनाऱ्याच्या लांबीप्रमाणे किनाऱ्यावर ठिकठिकाणी जीवरक्षक नेमायला हवेत. प्रत्यक्षात असे दिसत नाही. प्रसिद्ध काशीद बीच जवळजवळ 4 किमी परिसरात पसरलेला आहे. येथे 8 ते 10 जीवरक्षक हवेत. प्रत्यक्षात फक्त 3 ते 4 जीवरक्षक आहेत. मुरूड बीचवरदेखील हीच परिस्थिती आहे. काही ठिकाणी वॉच टॉवर आहेत तर काही ठिकाणी दुर्दशा झाली आहे.
समुद्राबाबत जनजागृती आवश्यक- बैले
काही वर्षांपासून निसर्गरम्य समुद्रकिनारी पर्यटन कमालीचे वाढले आहे. पर्यटक, शालेय सहली मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्या आहेत. आपल्याकडे त्यामानाने पर्यटकांना दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा कमी आहेत. सुरक्षिततेची साधने कमी आहेत. त्यामुळे दुर्दैवाने समुद्रात बुडण्याच्या दुर्घटना घडत असतात. समुद्र किनारे आणि सुरक्षितता यासाठी ठिकठिकाणी माहिती फलक आणि सातत्याने जनजागृती करीत राहणे गरजेचे आहे, असे मत रायगड जिल्हा मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष मनोहर बैले यांनी व्यक्त केले. पर्यटनातून शासनाला देखील उत्पन्न मिळत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेला देखील सर्वोच्च प्राधान्य हवे. समुद्रात पोहण्यासाठी उतरण्यापूर्वी पर्यटकांनी देखील फलकावरील माहिती वाचून, स्थानिक हॉटेल्स मधून मार्गदर्शन घ्यावे असे मत श्री. बैले यांनी व्यक्त केले.
.. तर दुर्घटना टळतील
शालेय सहलीसमवेत येणाऱ्या विद्यार्थी संख्येनुसार सोबत बुजुर्ग शिक्षक आणि काळजी घेण्यासाठी पुरेसे शिक्षक शाळेने पाठवावे, असा कडक नियमच शिक्षण विभागाने करावा.पाण्याचा अंदाज यावा, यासाठी पाण्यात रिंग किंवा तरंगते बोये उभे करावेत, म्हणजे होणारे अपघात टाळता येतील. अतिउत्साही पर्यटकांना आवरण्यासाठी पुरेसे पोलीस बळ देखील हवे, असे मत जीवरक्षक राकेश रक्ते यांनी व्यक्त केले.


Exit mobile version