| पनवेल | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात वर्षातील शेवटचा रविवार असल्याने दि.28 डिसेंबर रोजी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सुट्टीचा दिवस आणि आल्हाददायक हवामान याचा लाभ घेत लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक कुटुंबे कर्नाळा परिसरात दाखल झाली होती. महिला वर्गाचीही लक्षणीय उपस्थिती दिसून आली.

कर्नाळा येथील विविध जातींच्या पक्ष्यांचा किलबिलाट आणि निसर्गात घुमणारा पक्ष्यांचा मधुर आवाज पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत होता. पक्ष्यांचे आवाज ऐकत जंगलातून फेरफटका मारण्याचा अनुभव पर्यटकांसाठी अविस्मरणीय ठरला. यावेही कर्नाळा किल्ल्याच्या दर्शनासाठीही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. देशांतर्गत पर्यटकांसोबतच परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने कर्नाळा अभयारण्यात येत असल्याचे दिसून आले. निसर्गसौंदर्य, शांतता आणि जैवविविधतेमुळे कर्नाळा पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे. वर्षाच्या शेवटच्या रविवारी कर्नाळा परिसर पर्यटनाने आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने अक्षरशः फुलून गेला होता.







