तेरा हजार नागरिक तहानलेले
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
जलजीवन मिशनमुळे प्रत्येकाला मुबलक पाणी मिळणार, असा गाजावाजा रायगड जिल्हा परिषदेने केला होता. करोडो रुपये खर्च करून टाक्या, विहीरी बांधण्यात आल्या. मात्र आजही जलजीवनच्या आडात पाणीच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अलिबाग, पनवेल, पेण व कर्जत तालुक्यातील 70 गावांतील 13 हजारहून नागरिक तहानलेले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
प्रति व्यक्ती 55 लिटर पाणी मिळावे, यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत जलजीवन मिशन योजना सुरु करण्यात आली. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात आली. या योजनेसाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक गावे, वाड्यांमध्ये विहीरी, पाणी साठवण टाक्या बांधण्यात आल्या. पाण्याची समस्या सुटण्याची आशा रायगड जिल्ह्यातील नागरिकांना होती. मात्र ही आशा महाखोटी ठरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
जिल्ह्यामध्ये जानेवारीपासूनच पाण्याची टंचाई निर्माण झाली. पाणी कपातीकरणदेखील सुरु झाली. ही समस्या दिवसेंदिवस वाढत गेली. अलिबाग तालुक्यासह पनवेल, कर्जत, पेण, कर्जत तालुक्यातील 60 हून अधिक ठिकाणी पाण्याचा दुष्काळ निर्माण झाला आहे. तेरा हजारहून अधिक नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाण्यासाठी आठ-आठ दिवस वाट पहावी लागत आहे. दिवसेंदिवस टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. या पाच तालुक्यात सध्या 19 टँकरमार्फत पाणी पुरवठा केला जात आहे. गावांच्या शेजारी धरणे असूनही अनेक तालुक्यातील गावांना पाणी मिळत नाही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याकडे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग नक्की करते काय असा, सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
जलजीवन योजनेच्या माध्यातून 613 कामे पुर्ण झाली आहेत. गावोगावी जाऊन पाण्याच्या प्रश्नाबाबत माहिती घेतली जाते. जलजीवनच्या कामाचा आढावा घेतला जात आहे. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
भरत बास्टेवाड,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
रायगड जिल्हा परिषद





