श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल
| पाली/बेणसे | वार्ताहर |
अष्टविनायक देवस्थानांपैकी प्रख्यात पालीतील श्री बल्लाळेश्वराचा माघी मासोत्सव व श्री बल्लाळेश्वराचा जन्मोत्सव मंगळवारी (दि.13) मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी धार्मिक कार्यक्रम व विधी करण्यात आले. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांच्या लांब रांगा लागल्या होत्या. संपूर्ण परिसरात मोठी यात्रा भरली होती. तर विविध ठिकाणातून पदयात्रा देखील आल्या होत्या.
महाराष्ट्रासह देशभरातून आलेले भाविक बल्लाळेश्वराच्या चरणी लिन झाले. जन्मोत्सवाला बाळ गणेशाच्या मूर्तीला पाळण्यात टाकून भक्तिभावाने पाळणा हलविण्यात आले. यावेळी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे सरपंच (अध्यक्ष) जितेंद्र गद्रे , उपसरपंच (उपाध्यक्ष) वैभव आपटे, विश्वस्त प्रमोद पावगी, विश्वास गद्रे, अरुण गद्रे, अमोल साठे, डॉ. पिनाकिन कुंटे, माजी अध्यक्ष ऍड. धंनजय धारप आदी मान्यवर व भक्त उपस्थित होते. जन्म सोहळ्याच्या कीर्तनास व इतर कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक भक्त मंदिर परिसर व सजावटीच्या ठिकाणी फोटो व सेल्फी घेत होते. जत्रेत विविध दुकानातून करोडो ची उलाढाल होत आहे.
माघी महोत्सवानिमित्त प्रशासन, नगरपंचायत व देवस्थान यांच्या समन्वयातून योग्य नियोजन करण्यात आले होते. तुकाराम दैठणकर(पुणे) यांचे सनईवादन, अभिषेक आणि श्रींचे जन्मोत्सव कीर्तन झाले. सायंकाळी श्रींचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीभावात निघाला, तसेच श्री बल्लाळेश्वराला महानैवेद्य ठेवण्यात आले.
तसेच, वाहतूक सुरळीत रहावी व भाविकांना सुखरूप दर्शन व्हावे पोलीस तसेच, देवस्थानचे सुरक्षारक्षक देखील तैनात करण्यात आले होते. परिवहन महामंडळाच्या बसेस पाली बाहेर थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे पाली स्थानकात बस आल्या नाहीत.
खरेदीसाठी लगबग यात्रेत मिठाई, खेळणी, गृहोपयोगी सामग्री व अन्य सजावटीचे साहित्य, उबदार कपड्यांची दुकाने लागली आहेत. त्यामुळे महिला वर्गांची खरेदारीची लगबग पाहायला मिळत आहे. या यात्रेत मनोरंजनासाठी विविध प्रकारचे पाळणे, आकाश पाळणे, मौत का कुआ आदी लोकांना आकर्षित करत आहेत. बच्चे कंपनी मौजमजा मस्ती करत होती.