पेण भाजपात होणार खांदेपालट

तालुकाध्यक्ष बदलण्याचा घडामोडींना वेग

| पेण | प्रतिनिधी |

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या ओढांगी प्रभागामध्ये फक्त 8 मतांची आघाडी मिळाली, तर वाशी ग्रामपंचायतीमध्ये महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना 1,235 तर अनंत गीते यांना 1,292 मतं मिळाली. एकंदरीत, अध्यक्षांच्या वाशी ग्रामपंचायतीमध्ये 57 मतांची आघाडी अनंत गीते यांना मिळाल्याने भाजप पक्षश्रेष्ठींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या अगोदर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्येदेखील महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश ठाकूर हे निवडून आले होते. तेव्हादेखील पक्षश्रेष्ठींनी अध्यक्षांना तंबी दिली होती. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा अध्यक्षांना आघाडी मिळवण्यात अपयश आल्याने तालुकाध्यक्ष बदलण्याच्या घडामोडींना वेग आला आहे.

पक्षश्रेष्ठींकडून भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील यांना अध्यक्षपदासाठी विचारणा केली होती. परंतु, त्यांनी नकार दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे नव्या अध्यक्षाची शोधमोहीम जोरदार सुरू आहे. त्यातच वाशी सरपंच यांचा भाजपमध्ये प्रवेश होत असल्याचे समजते. परंतु, त्यांना तालुकाध्यक्षपदाची अट ठेवल्याने सध्या तरी पक्षप्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आताच्या घडीला जि.प. सदस्य डी.बी. पाटील अथवा जि.प. सदस्य प्रभाकर म्हात्रे (हरि ओम) यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. एकंदरीत, पेण भाजप तालुकाध्यक्ष बदलण्याच्या घडामोडींचा वेग वाढला असून, विधानसभा निवडणुकीअगोदर तालुकाध्यक्ष बदलला जाणार अशी खात्रीशीर सूत्रांकडून माहिती आहे.

Exit mobile version