विधानपरिषदेच्या निवडणुकीत होणार तगडी फाईट

महायुतीचे टेन्शन वाढले

। रायगड । प्रतिनिधी ।

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार असून मंगळवारी दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे भाजपचे 5, एकनाथ शिंदेंची शिवसेना 2, अजित पवारांची राष्ट्रवादी 2 तर महाविकास आघाडीतील काँग्रेसचा 1 उमेदवार आणि अजून एक जागा निवडून येऊ शकते. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेने देखील एक उमेदवार दिल्याने विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला असून मते फुटण्याच्या भीतीने महायुतीचे टेन्शन वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

विधान परिषदेसाठी महायुतीमधील भाजपने पकंजा मुंडे, योगेश टिळेकर,डॉ. परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली आहे.तर शिंदेंच्या शिवसेनेने दोन माजी खासदारांना उमेदवारी जाहीर केली आहे. यात यवतमाळ-वाशिमच्या माजी खासदार भावना गवळी आणि रामटेकचे माजी खासदार कृपाल तुमाने यांच्या नावांचा समावेश आहे. तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेने पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना संधी दिली आहे. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर करत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत मते फुटण्याची शक्यता आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी आठ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांसाठी महायुतीमध्ये क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार असून निवडून येण्यासाठी 23 मते आवश्यक आहेत. तसेच काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसकडे 36 मते आहेत. यातील काँग्रेसची 24 मते प्रज्ञा सातव यांना दिली गेली, तर त्यांच्याकडे 12 मते शिल्लक राहतात. ही मते आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मते मिळून शेकापचे जयंत पाटील यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. तसेच त्यांचे एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांशीही चांगले संबंध आहेत. याशिवाय भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही नार्वेकरांचा चांगला सुसंवाद आहे. त्यामुळे महायुतीतील काही आमदार क्रॉस व्होटिंग करण्याची शक्यता असल्याची चर्चा दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष बाब म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आणि शिंदेंच्या शिवसेनेतील काही आमदार ठाकरे आणि पवारांच्या पक्षात येण्यास इच्छुक असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवारही निवडून आल्यास महायुतीसाठी हा मोठा धक्का असू शकतो.

Exit mobile version