खारघरमध्ये होणार ट्राफिक पार्क

साडेनऊ हजार चौरस मीटर भूखंडावर प्रकल्प साकारणार
पनवेल महापालिका 10 कोटी रुपये खर्च करणार
। पनवेल । वार्ताहर ।
आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत. त्यांना लहानपणापासूनच वाहतुकीचे नियम माहिती व्हावेत या अनुषंगाने पनवेल महानगरपालिका खारघर येते ट्राफिक पार्क साकारणार आहे. साडेनऊ हजार चौरस मीटर भूखंडावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याचा आराखडा तयार करण्यात आला असून लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणयात येणार असल्याचे पनवेल महापालिकेकडून सांगण्यात आले. यासाठी दहा कोटी रुपये खर्च येणार आहे.
आजच्या स्थितीला अनेक वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे अपघात आणि वाहतूक कोंडी सारखे प्रश्‍न निर्माण होतात. या सर्व पार्श्‍वभूमीवर वाहतुकीबाबत मुले आणि मुली जागृत व्हावेत. त्यांचे प्रबोधन व्हावे व भविष्यामध्ये त्यांच्याकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे या उद्देशाने पनवेल महानगरपालिका ट्राफिक पार्क उभारणार आहे. खारघर येथे सेक्टर 35 मधील प्लॉट क्रमांक 9 ए या जागेवर 9 हजार 407 चौरस मीटर भूखंडावर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. याकरता आसीम ब्रोकर्स हवर्स ही कन्सल्टंट एजन्सी नियुक्त करण्यात आली होती. त्यांनी याबाबतचा आराखडा तयार केला आहे. लवकरच निविदा प्रसिद्ध करून या कामासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात येणार आहे.

प्ले झोनची खास व्यवस्था
खारघर येथे विकसित करण्यात येणार्‍या ट्राफिक पार्कमध्ये प्ले झोन असणार आहे. येथे वाहतुकी संदर्भातील खेळणी बसविण्यात येणार असून त्या माध्यमातून मुलांना वाहतुकीच्या नियमांचे धडे दिले जाणार आहेत. येथे पिण्याच्या पाण्याबरोबरच शौचालय आणि इतर सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.

Exit mobile version