राज्य उत्पादन शुल्क विभाग रायगडमार्फत विशेष पथकांची नेमणूक
| रायगड | प्रमोद जाधव |
सरत्या 2025 या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यात पर्यटक येऊ लागले आहेत. थर्टीफर्स्टच्या निमित्ताने अवैध दारु विक्री, वाहतूक व निर्मितीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग कामाला लागले आहे. हा काळा बाजार रोखण्यासाठी सात विशेष भरारी पथक कामाला लागले आहेत. विना परवाना दारु विक्री करणाऱ्यांविरोधात या विभागामार्फत कारवाई केली जाणार आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने रायगड जिल्हा कायमच पर्यटकांच्या पसंतीला उतरला आहे. यंदा बहुतांश पर्यटकांनी सरत्या वर्षाला निरोप देण्याचा आनंद रायगड जिल्ह्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अलिबागसह नागाव, आक्षी, किहीम, आवास, मांडवा, रेवदंडा, वरसोली, काशीद, मुरूड, श्रीवर्धन, दिवेआगर, म्हसळा येथील हॉटेल व कॉटेजची बुकींग झाली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 2 हजारपेक्षा अधिक हॉटेल, कॉटेज व रेस्टॉरन्ट आहेत. काही ठिकाणी फार्म हाऊसदेखील आहेत. समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी पसंती दर्शविली असली, तरी फार्महाऊस व कॉटेजला अधिक पसंती आल्याचे सांगण्यात आले आहे. ज्या ठिकाणी पोहणे व इतर सुविधा आहेत, त्याठिकाणी पर्यटकांनी प्राधान्य दिल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर काही हॉटेल, रेस्टॉरन्टमध्ये वेगवेगळ्या सवलती ठेवण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमदेखील होणार आहेत. त्यामुळे यंदा पर्यटकांनी पंधरा दिवस अगोदरच बुकींग केल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली आहे.
28 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात अनेक हॉटेल फुल्ल असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदा थर्टी फर्स्ट मधल्याच दिवशी म्हणजेच बुधवारी आल्याने या दिवशी पर्यटकांची गर्दी दरवर्षीपेक्षा कमी असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तरी देखील काही ठिकाणी मद्यपी देखील असणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात या कालावधीत बनावट दारूची विक्री करून त्याची बेकायदेशीररित्या वाहतूक करीत असल्याच्या घटना घडत असतात. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी रायगडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने कडक कारवाई करण्याची मोहीम सुरु केली आहे. यावेळी जिल्ह्यात सात विशेष भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाद्वारे तपासणी सुरु केली आहे. बेकायदेशीरित्या गावठी दारुची विक्री, वाहतूक करणारे तसेच दुकानांमध्ये अनधिकृतपणे साठा ठेवून विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या गोडाऊनची माहिती घेऊन त्यांची तपासणी केली जाणार आहे. तसेच, परराज्यातील बनावट मद्य विक्री, निर्मिती करणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
संशयीत व्यक्तींची तपासणी
वेगवेगळ्या राज्यातून रायगड जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. साधारणतः रेल्वेने अधिक मंडळी येतात. त्यामुळे परराज्यातील मद्य आणून अधिक दरात विकण्याची शक्यता नाकारता येत नाही. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून येणाऱ्या मद्यावर अंकूश ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क रायगड विभाग, रेल्वे विभागाची मदत घेणार आहेत. जिल्ह्यातील प्रमुख रेल्व स्थानकांमध्ये संशयित व्यक्तीच्या सामानाची आणि संशयित वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे.
नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी थर्टी फर्स्टला जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यादरम्यान, दारु विक्रीदेखील काही ठिकाणी केली जाते. त्यामुळे या कालावधीत मद्य विक्रीसाठी एक दिवसाचा परवाना उपलब्ध करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पडताळणी करून परवाने दिले जाणार आहेत. विना परवाना मद्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
-रविंद्र कोले,
अधीक्षक,
राज्य उत्पादन शुल्क, रायगड विभाग







