कर्जत-कल्याण रस्त्यालगत बांधकाम
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत-कल्याण या राज्यमार्गावर नेरळ ग्रामपंचायत हद्दीत मागील चार महिन्यांपासून दुकानांचे गाळे बांधण्याचे काम सुरु आहे. ते बांधकाम बंद करण्यात यावे यासाठी नेरळ विकास प्राधिकरण संकुल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, तरीदेखील कोणत्याही प्रकारच्या नोटिसींना न घाबरता बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद नेरळ विकास प्राधिकरण यांनी बजावलेल्या नोटिशील संबंधिताने केराची टोपली दाखविली असल्याची चर्चा सुरू आहे.
कर्जत-कल्याण मार्गावरील नेरळ येथील पेट्रोल पंप भागात बांधकाम करण्यात आले आहे. हा राज्यमार्ग असल्याने रस्त्याच्या मध्यापासून ठराविक मीटर अंतर सोडून बांधकाम करता येते. मात्र, हे बांधकाम जमिनीचे मालक शाहजाद युसूफ कपाडिया यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला सार्वजनिक बांधकाम खात्याने लावलेल्या माईल स्टोनच्यापुढे बांधकाम करण्यात आले आहे. काही ठिकाणचे माईल स्टोन देखील संबंधित बांधकाम करणार्यांनी हलवून अन्य ठिकाणी उभे केले आहेत. तसेच, त्या ठिकाणी डोंगरातून येणार्या पाण्याचा नैसर्गिक नाला संबंधितांकडून बांधकामाच्या खाली गाडण्यात आला आहे. त्यामुळे डोंगरावरून येणारे पाणी रस्त्यावर साचून राहणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, नेरळ संकुल विकास प्राधिकरण यांच्याकडून कपाडिया यांना 6 सप्टेंबर रोजी नोटीस बजावण्यात आली होती. त्या नोटिसीमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये आणि बांधकाम सद्यस्थितीत बंद करावे, असे नमूद केले होते. त्याचवेळी नेरळ ग्रामपंचायतीने या बांधकामाला कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच नेरळ प्राधिकरणाच्या नोटीसा येऊन देखील हे बांधकाम बिनधास्तपणे सुरु असून नेरळ गावामध्ये त्या बांधकामाला राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा देखील सुरु आहे.