धावत्या बसमध्ये चोरी करणारा अटकेत

| पनवेल | वार्ताहर |

मुंबई- पूणे द्रुतगती महामार्गावर धावत्या खासगी ट्रॅव्हल्स बसमधील महिला प्रवाशांची पर्स चोरीतून लाखोंचा मुद्देमाल चोरणार्‍या चोरट्याला कामोठे पोलिसांच्या पथकाने अखेर अटक करुन त्याची रवानगी तळोजा मध्यवर्ती कारागृहात केली. मूळ गुजरात येथे राहणारा आकाश पटेल (32) असे या संशयीत चोरट्याचे नाव आहे.

मार्च आणि एप्रिल महिन्यात चार वेगवेगळ्या चोरीच्या घटनांची नोंद महिला प्रवाशांनी कामोठे पोलीस ठाण्यात केली होती. एक सारख्याच पद्धतीने चोर्‍या वाढल्यामुळे कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी चोरट्याला पकडण्यासाठी खास पोलिस पथकाची नेमणूक केली. अथक तपासानंतर अखेर लोणावळा येथील एका हॉटेलमध्ये संशयित थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर कामोठे पोलिसांनी हॉटेलमधील वेटरचे कपडे घालून सापळा रचला. पहाटे सहा वाजता संशयित आल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने 15 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरल्याचे कबूल केले. आकाश हा सूरत (गुजरात) येथील बारडोली तालुक्यातील वराड या गावचा मूळ रहिवाशी आहे. आकाश हा द्रुतगती महामार्गावरील टोलनाक्याच्या काही अंतरापुढे स्वतःचे वाहन बिघडल्याचे सांगून खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला थांबवून त्या बसमध्ये प्रवाशांप्रमाणे चढल्यानंतर सीट मोकळी आहे का हे बघण्याच्या बहाण्याने स्लीपर सीटसमोरील पडदे उघडून झोपलेल्या महिलांच्या पर्स चोरत होता. काही मिनिटांनी तो मागून त्याची मोटार येत असल्याचा बहाणा करुन द्रुतगती महामार्गावरील दुसरा टोलनाका येण्याच्या पूर्वी बसमधून उतरत असे. त्यामुळे तो टोलनाक्यावरील सीसीटिव्ही कॅमेरांमध्ये कैद झाला नाही.

Exit mobile version