। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
वडखळ येथून ड्यूटी संपवून अजित देशमुख, विवेक पाटील हे आरएसपीचे दोन कर्मचारी सोमवारी (दि.1) सकाळी अलिबागकडे येत होते. रस्त्यात त्यांना एक संशयित रिक्षा दिसली. त्यामुळे या दोन पोलिसांनी रिक्षाचा पाठलाग केला. आपला पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी रिक्षाचा वेग वाढवला. यानंतर अत्यंत थरारक पाठलाग सुरु झाला. शेवटी सहाणगोठी गावाजवळ रिक्षा सोडून हे चोरटे पळून गेले.
अजित देशमुख, विवेक पाटील या दोघांनी गावकर्यांना माहिती देऊन त्यांचा शोध घेण्यास सांगितले आणि अलिबाग पोलीस स्टेशनला आले. यादरम्यान सहाणगोठी गामस्थांना दोन चोरट्यांना पकडण्यात यश आले.
चार ते पाच चोरटे असावेत, असा अंदाज असून त्यांचा शोध पोलीस आणि ग्रामस्थ घेत आहेत. या चोरट्यांकडे 8 मोबाईल आणि चोरी करण्यासाठी साहित्य आढळून आले आहे. या चोरट्यांकडून चोरी करण्यासाठी लागणारी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.