तीन बैलांची चोरी करणारे गजाआड

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील माले या गावातील मोकळ्या माळरानावर चरण्यासाठी गेलेल्या तीन गोवंशीय बैलांची चोरी झाली होती. नेरळ पोलिसांनी याचा तपास करुन या प्रकरणी तिघांना ठाणे जिल्ह्यातून मुद्देमालासह अटक केली आहे.

पोशीरजवळील मौजे माले या गावात राहणारे गोपाळ लक्ष्मण वेहले यांच्या मालकीचे तीन बैल 26 मे 2024 ते 8 जुन 2024 रोजीच्या दरम्यान घराच्या पाठीमागे माळरानातील मोकळ्या जागेत चरण्यासाठी सोडले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बैल चोरून नेल्याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात 8 जुन 2028 रोजी तकार दिली होती. तीन बैलांचा शोध घेण्यासाठी नेरळ पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी गुन्हयाचा तपास सहायक फौजदार श्रीरंग किसवे यांच्याकडेे दिला. पोलीसांनी गुन्हा उघडकीस आणला. आरोपी साहिल नावेद शेख, वय-20 वर्षे, रा. रेतीबंदर रोड. हमालवाडी, कल्याण पश्‍चिम, जि. ठाणे, इम्तियाज मोहम्मद इलियास शेख, वय-32 वर्षे, रा. जहीर मौलवी बिल्डींग, वर्तक रोड, कल्याण पश्‍चिम, जि. ठाणे, अकबर जाबाज शेख, वय-28 वर्षे, रा. जहिर मौलवी चाळ, रेतीबंदर रोड, कल्याण पश्‍चिम, जि. ठाणे यांना 1 जुलै रोजी अटक करण्यात आले. तसेच, आरोपींनी गुन्हा करण्याकरीता वापरलेली एक निळसर रंगाची स्कॉर्पिओ गाडीदेखील हस्तगत करण्यात आली आहे.

Exit mobile version