| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेले श्याम वाईन चोरट्याने फोडले. दुकानातील रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.19) पहाटेच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग शहरातील पीएनपी नगर परिसरात श्याम वाईन नावाचे दुकान आहे. गुरुवारी रात्री दुकान बंद करून मालक व कामगार घरी गेले. सकाळी दुकान उघडण्यास आल्यावर दुकानातील ग्रील, शटरचे कुलप तुटलेले दिसून आले. चोरी, घरफोडी झाल्याचे लक्षात आल्यावर दुकानदार चौधरी यांनी अलिबाग पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले. यावेळी दुकानातून सुमारे 60 हजारांहून अधिक रोख रक्कम व दारुच्या बाटल्या चोरून नेण्यात आले.
दुकानात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद झाला आहे. त्याने तोंडाला मास्क लावले असून, त्याच्या हातात सळई असल्याचे दिसून आले आहे. तो एकटाच असल्याचे बोलले जात आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात मालमत्ता सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अलिबाग पोलिसांना या चोरट्यांनी खुले आव्हान केले आहे. अलिबाग पोलीस या चोरट्यांना पकडण्यात यशस्वी ठरतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.







