। हैद्राबाद । वृत्तसंस्था ।
सद्यःस्थितीत चोरांनी वस्तू चोरण्याऐवजी थेट कोरोना लसीकरणासाठी वापरण्यात येणार्या लसींवरच डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी थोड्या थोडक्या नव्हे तर चक्क 550 लसींच्या कुपी चोरून नेल्या आहेत.
यामध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या 300 हून अधिक तर, सीरमच्या कोविशील्ड लसींच्या साधारण 250 कुपी चोरल्याचे सांगितले जात आहे. ही घटना हैद्राबाद येथे रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या गुन्ह्यामागे व्यावसायिक चोरांचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जामबाग येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित आहे. दरम्यान. रविवारी रात्रीच्या सुमारास याशिवाय चोरट्यांनी या केंद्रातील बीसीजी, डीपीटी आणि ओपीव्ही लसींसह संगणक आणि आवारात उभ्या असलेल्या ऑटोरिक्षांचे टायरही लुटून नेले.
सोमवारी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी जेव्हा कार्यालयात आले, त्यावेळी हा सर्व प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत, अशी माहिती मिरचौक पोलीस स्टेशनचे निरीक्षक एम अप्पाला नायडू यांनी सांगितले.