| पनवेल | प्रतिनिधी |
कामोठे सेक्टर-36 परिसरात रात्रीच्या जेवणानंतर शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या अंगावरील सोन्याची चेन खेचून दुचाकीवरून आलेले चोरटे पसार झाले कामोठे पोलिसांनी या घटनेतील दोघा लुटारूंविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुजाता वाघमारे (40) या खारघर, सेक्टर-36 मध्ये तर त्यांची बहीण ही त्याच परिसरात राहते. सुजाता वाघमारे या कामानिमित्त त्यांच्या बहिणीकडे गेल्या होत्या. जेवल्यानंतर सुजाता वाघमारे या शतपावली करण्यासाठी गेल्या होत्या. त्या सेक्टर-36 मधील ज्युडिओशेजारील अक्षरकॉन बिल्डिंगजवळ आल्या असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा लुटारूंपैकी पाठीमागे बसलेल्या लुटारूने सुजाता वाघमारे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचली, दरम्यान सुजाता वाघमारे यांनी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत हे दोघे लुटारू भरधाव वेगात तेथून पसार झाले. या घटनेनंतर सुजाता वाघमारे यांनी कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या घटनेतील लुटारू सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असले, तरी त्यांनी आपली ओळख पटू नये यासाठी तोंडाला रुमाल बांधल्याचे आढळले. तरी या लुटारूंचा इतर मार्गाने शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.







