| पनवेल | वार्ताहर |
खारघर वसाहतीमध्ये अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरात पायी चालणार्या दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याच्या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटना रात्री साडेदहा ते दहा वाजून चाळीस मिनिटांनी या वेळेत घडल्या असून, यामुळे पोलीस गस्त आणि महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पहिली घटना रात्री साडेदहाच्या सुमारास सेक्टर 15 येथील पारीजात सोसायटीच्या गेटसमोरील रस्त्यावर घडली. 63 वर्षीय ज्येष्ठ महिला शतपावलीसाठी रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. काही समजण्याच्या आतच चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. या प्रकारामुळे महिला भीतीच्या सावटाखाली भेदरून गेल्या.
या घटनेनंतर अवघ्या दहा मिनिटांत, म्हणजेच रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी, सेक्टर 19 येथील शाळेजवळील रस्त्यावर कॅनरा बँकेसमोरून जाणार्या दुसर्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रही अशाच पद्धतीने हिसकावण्यात आले. दोन वेगवेगळ्या ठिकाणी सलग घडलेल्या या घटनांमुळे खारघर तसेच पनवेल परिसरातील महिलावर्गात तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
विशेष म्हणजे खारघरमध्ये मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही कॅमेर्यांचे जाळे असतानाही चोरट्यांना त्याची किंवा पोलिसांची कोणतीही भीती उरलेली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. खारघरचा विस्तार वेगाने होत असताना रात्रीच्या वेळेस पोलीस गस्तीचे प्रमाण अपुरे असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या दोन्ही घटनांची नोंद खारघर पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून, सुमारे दोन लाख रुपये किमतीची दोन मंगळसूत्र चोरीस गेल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांत पनवेल व खारघर ‘स्मार्ट सिटी’ असल्याचे दावे केले जात असताना, प्रत्यक्षात महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर त्रुटी समोर येत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.






