रोह्यात चोरट्यांनी अशी केली चोरी; ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

| अलिबाग | प्रतिनिधी |
सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे बंद घर फोडून चोरट्याने घरातील सुमारे 9 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. मंगळसुत्रासह, बांगड्या आदी सोन्याचे दागीने चोरट्याने लंपास केले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात पोलीसांना यश आले आहे.

रोहा येथील भुवनेश्वर येथील एक सेवानिवृत्त अधिकारी व त्याची पत्नी असे दोघेजण एका बंगल्यामध्ये राहत होते.घर बंद करून ते जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत बंगल्याच्या खिडकीची ग्रील तोडून चोरटे घरात घुसले. त्यांनी 31 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, व अर्धा किलो वजनाचे चांदीचे भांडे असा एकूण नऊ लाख रुपयांचा ऐवज चोरला होता. ही बाब या दांम्पत्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी रोहा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार केली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडे वर्ग करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सुरुवातीला तांत्रिक बाबी तपासण्यास सुरूवात केली. त्यामध्ये परिसरातील फोनचा डाटा घेणे, मोबाईल लोकेशन घेणे अशा अनेक प्रकारच्या तांत्रिक बाबीचा अभ्यास केला. पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे यांनी केलेल्या तांत्रिक अन्वेषणावरून या गुन्ह्यातील आरोपी मध्यप्रदेश येथील असल्याचे निष्पन्न झाले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलीस हवालदार प्रतिक सावंत, जितेंद्र चव्हाण, राकेश म्हात्रे, पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे, विशाल आवळे, सचिन वावेकर, अक्षय सावंत, सायबर सेलचे तुषार घरत, अक्षय पाटील, यांचे एक पथक तयार करण्यात आले. दुर्गम भागातील गेटा गांव येथे पोहचले. मध्यप्रदेश येथील गुन्हे शाखेचे भैरवसिंग देवडा, रामसिंग गौरे, आर. बलराम, प्रशांतसिंग चव्हाण यांची मदत घेत तिघांना ताब्यात घेण्यात आले. या तिघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले.

अशी केली चोरी
रोहा येथील एका बंगल्यात चोरी करणाऱ्या आरोपींचे नाव कैलास कमरू डावर, निहालसिंग गोवन सिंग डावर, सोहबत इंदरसिंग डाव अशी असून ते रेल्वेने काही दिवसांपुर्वी पनवेलला आले होते. रोहा येथे आल्यावर त्यांनी वेगवेगळ्या घरांची पाहणी केली होती. दरम्यान रात्रीच्यावेळी पाहणी करीत असताना सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा बंगला बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या संधीचा फायदा घेत खिडकीची ग्रील उपकून घरात प्रवेश केला. घरात ठेवलेल्या सोने व चांदीचा ऐवज लंपास करून चोरट्यांनी तेथून पळ काढला.त्यानंतर ते मध्यप्रदेशला पळून गेले. रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या घरफोडीतील गुन्ह्याची उकल करण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून चोरट्यांची माहिती घेऊन त्यांना अटक करण्यात आले आहे. आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून शंभर टक्के मुद्देमाल जप्त केला आहे.

Exit mobile version