| मुंबई | प्रतिनिधी |
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकावर जोरदार हल्लाबोल केला. देशात हुकूमशाही सुरू असल्याचे सांगत आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, एप्रिल महिन्यात मोदी सत्तेतून जातील, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला. आता, मनसेप्रमुख राज ठाकरेंनीही संजय राऊतांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे.
देशात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन सुरू असतानाच रिजीम चेंज करण्याचा विषय पुढे आला. यावरून भाजपा आणि विरोधी पक्षांमध्ये वाद सुरू असताना आता राज ठाकरे यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. बुधवारी (दि.21) पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांना संजय राऊत यांच्या एका विधानावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, पुढील चार-पाच महिन्यांत देशात काहीतरी मोठी गडबड होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री हरदीप पुरी यांचा जेफ्री एपस्टीनबरोबरचा एक फोटो एक्सवर शेअर केला. तसेच, लवकरच पंतप्रधान मोदी पायउतार होणार असल्याचे म्हटले आहे. त्यावर राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी, पुढील काळात खूप गोष्टी बाहेर येतील. सरकार चुकांवर चुका करत राहणार. आता हे थांबणार नाही. पुढच्या काही महिन्यांत संपूर्ण देश रस्त्यावर आला तरी मला आश्चर्य वाटणार नाही, असेही विधान राज ठाकरे यांनी यावेळी केले.
काही महिन्यांपूर्वी परीक्षेबाबत आंदोलन झाले, आता निवडणूक आयोगाच्या विषयावर आंदोलन सुरू आहे. नीट आंदोलनावेळी जी मुले, विद्यार्थी रस्त्यावर उतरले त्यातील प्रत्येकजण काही विद्यार्थी नव्हता. पण त्यांच्या मनात कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा राग होता. तो त्या माध्यमातून बाहेर आला. महाराष्ट्रातील आजची परिस्थिती पाहिली तर सरकारनेच 300 हून अधिक तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. पुढे आणखी परिस्थिती खराब होऊ शकते. अन्नधान्याची टंचाई होऊ शकत, असा अंदाज राज ठाकरे यांनी बांधला. तसेच, पुढे आणखी भीषण परिस्थिती येणार असल्याचे सांगताना राज ठाकरे म्हणाले, सरकारला ही परिस्थिती झेपणार नाही. तसेच, असा एक छोटा काळ येईल, जेव्हा या देशाला पंतप्रधानच नसतील, असा मोठा दावाही राज ठाकरे यांनी केला.
काही महिन्यांत गडबड होणार: राज ठाकरे
