32 ठिकाणी बसवले 127 सीसीटीव्ही कॅमेरे
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग शहरातील नागरिक व मालमतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरात 32 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे आता शहरातील प्रत्येक हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.
जिल्हा वार्षिक योजना व इतर जिल्हा योजनेच्या माध्यमातून सीसीटीव्ही 127 कॅमेरे लावण्यात आले आहेत. अलिबाग पोलीस ठाणे येथे सर्वसोयींसुविधांनी सुसज्ज असे सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष तयार केले आहे. या कक्षामार्फत एकाच वेळी 64 कॅमेरांचे फुटेज पहाता येतील इतक्या मोठ्या आकाराचे युएचडी स्क्रीन बसविले आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची माहिती सॉफ्टवेअरद्वारे गोळा होणार आहे. पोलिसांना संशयित गुन्हेगारालादेखील यातून शोधता येणार आहे. हा प्रकल्प शहरातील पोलीस विभागाचे व वाहतूक विभागाच्या कामकाजासाठी उपयुक्त होणार असून कायदा व सुव्यवस्था राखणे सोपे होणार असल्याची माहिती नगरपरिषदेकडून देण्यात आली आहे.
अलिबाग शहरात नागरिकीकरणाबरोबर पर्यटनदेखील झपाट्याने वाढत आहे. शहरातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 32 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. प्रवेशद्वारापासून शहरातील वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचा फायदा शहरातील नागरिकांसह पोलीस दलाला होणार आहे. नगरपरिषद प्रशासनाने चांगले पाऊल उचलले आहे. त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त केले जात आहे.
प्रशांत नाईक, माजी नगराध्यक्ष