सिग्नलवर भिकाऱ्यांसह तृतीयपंथीयांचा उपद्रव

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल परिसरातील अनेक सिग्नलवर भिकारी आणि तृतीयपंथीयांचा उपद्रव वाढला आहे. विशेषतः शहरातील बहुतांशी प्रमुख सिग्नलवर तृतीयपंथीयांनी कब्जा केला आहे. सिग्नलवर गाडी थांबताच हे तृतीयपंथीय त्या गाडीला गराडा घालत आहेत. त्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडते. या पार्श्वभूमीवर या तृतीयपंथीयांवर कारवाईची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

वाहतूक नियंत्रणाच्या दृष्टीने शहरात आवश्यक तेथील चौकात आणि रस्त्यांवर वाहतूक विभागाने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. यातील प्रमुख सिग्नल आणि चौकात भिकारी आणि तृतीयपंथीयांनी आपले बस्तान ठोकले असून भीक मागणाऱ्या तृतीयपंथीयांची संख्या वाढल्याचे दिसून येते. अनेक वेळा गाडीच्या काचेवर थाप मारत पैसे मागतात, भीक मागणारे लहान मुले आणि वृद्ध महिला चक्क गाडीच्या समोर येऊन विनवणी करताना दिसतात. बहुतांशी सिग्नलवर तृतीयपंथीयांचा उपद्रव वाढल्याचे दिसून आले आहे. सायन-पनवेल महामार्गावरील सिग्नल तर तृतीयपंथीय आणि भिकाऱ्यांना आंदण दिल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर हे तृतीयपंथीय आणि भिकाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.

Exit mobile version