| हैदराबाद | वृत्तसंस्था |
हैदराबाद येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या 25व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने हैदराबादचा 14 धावांनी पराभव करत विजयाची हॅटट्रिक नोंदवली.
हैदराबादसमोर विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य होते, परंतु संपूर्ण संघ 19.5 षटकांत 178 धावांत सर्वबाद झाला. हैदराबादला शेवटच्या षटकात 20 धावांची गरज होती, पण अर्जुन तेंडुलकरने केवळ 4 धावा दिल्या. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिला बळीही घेतला. 20व्या षटकाच्या 5व्या चेंडूवर त्याने भुवनेश्वर कुमारला कर्णधार रोहित शर्माकरवी झेलबाद केले.
हैदराबादकडून मयंक अग्रवालने सर्वाधिक 48 तर हेनरिक क्लासेनने 16 चेंडूत 36 धावांची स्फोटक खेळी केली. तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने कॅमेरून ग्रीनच्या 64 आणि इशान किशनच्या 38 धावांच्या जोरावर 5 गडी गमावून 192 धावा केल्या. 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली होऊ शकली नाही. त्यांनी अवघ्या 11 धावांवर पहिली विकेट गमावली. गेल्या सामन्यातील शतकवीर हॅरी ब्रूक 9 धावा करून बाद झाला. बेहरेनडॉर्फने त्याला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. लवकरच हैदराबादला आणखी एक धक्का बसला जेव्हा राहुल त्रिपाठी 7 धावा करून बेहरेनडॉर्फच्या चेंडूवर ईशान किशनकरवी झेलबाद झाला.
मयंक अग्रवाल आणि मार्कराम यांनी तिस़र्या गड्यासाठी 46 धावा जोडल्या, परंतु 22च्या वैयक्तिक धावसंख्येवर तो ग्रीनच्या चेंडूवर हृतिक शोकीनकरवी झेलबाद झाला. अभिषेक शर्माही लगेट 1 धावा काढून बाद झाला. परंतु क्लासेन आणि अग्रवाल यांनी 5व्या विकेटसाठी झटपट 55 धावा जोडून हैदराबादला सामन्यात ठेवले होते. क्लासेनने 16 चेंडूत 36 धावांची स्फोटक खेळी खेळली. त्याला पियुष चावलाने बाद केले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने सनरायझर्स हैदराबादसमोर 193 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मुंबईकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक 64 धावांची खेळी खेळली. ग्रीनशिवाय तिलक वर्माने 16 चेंडूत 37 धावा केल्या. तत्पूर्वी, रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी मुंबईच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 4.4 षटकात 41 धावा जोडल्या. यादरम्यान रोहित शर्माने आयपीएल कारकिर्दीतील 6 हजार धावा पूर्ण केल्या. त्याला टी नटराजनने 28 धावांवर बाद केले.
सनरायझर्स हैदराबादला शेवटच्या षटकात 20 धावांची गरज होती. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने युवा अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजीसाठी बोलावले. अर्जुनने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत अवघ्या 4 धावा दिल्या. त्याच्या षटकात 2 विकेटही पडल्या. अब्दुल समद दुसर्या चेंडूवर धावबाद झाला आणि पाचव्या चेंडूवर अर्जुन तेंडुलकरने भुवनेश्वर कुमारला रोहित शर्माकडे झेलबाद करून सनरायझर्सचा डाव गुंडाळला. अर्जुनने 2.5 षटकात 18 धावा देत त्याने कसून गोलंदाजी केली. त्याला कारकीर्दीतील पहिले यश मिळाले. त्याने सर्व चेंडू यॉर्कर आणि ऑफसाइड द ऑफ टाकत संघाला रोमांचक विजय मिळवून दिला.