तेरा ग्रामपंचायतींचा उडणार धुरळा

ऐन थंडीत तालुक्यातील राजकीय वातावरण तापणार

| म्हसळा | वार्ताहर |

म्हसळा तालुक्यातील तेरा ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला असून, आगामी जिल्हा परिषद, तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका मोठ्या चुरशीच्या होणार असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. डिसेंबरमध्ये मुदत संपणार्‍या या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. 18 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 20 रोजी मतमोजणी होईल.

या ग्रामपंचायती मध्ये खरसई, संदेरी, तोंडसुरे, कांदळवाडा, तोराडी, घोणसे, काळसुरी, देवघर, फळसप, लेप, कणघर, निगडी, रेवळी यासारख्या म्हसळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामुळे म्हसळा तालुक्याचे राजकारण ढवळून निघणार आहे. आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या दृष्टिकोनातून प्रत्येक जण ग्रामपंचायत निवडणुकीकडे बारीक लक्ष देणार आहे. प्रत्येक पक्ष व आपल्या गटातील गावे आपल्या ताब्यात राहण्यासाठी सर्वच नेत्यांकडून प्रयत्न करण्यात येणार यात शंका नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्वच गावांच्या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत.

तेरा ग्रामपंचायतीचे सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमात सरपंचपदाची निवड थेट मतदारांमधून होणार असल्यामुळे निवडणूकीत मोठा उत्साह निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतनिहाय सरपंचपदासाठी आरक्षण निश्‍चित असल्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांकडून ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक व्यूहरचनेची जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी झालेल्या या तेरा ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीकडे आठ, शिवसेनेकडे दोन, शेकापकडे एक तर एका ग्रामपंचायतीमध्ये अपक्ष असे पक्षीय बलाबल होते.

Exit mobile version