। नाशिक । प्रतिनिधी ।
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडेल आणि पाचव्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. मात्र, आता पाचव्या टप्प्यातील मतदारसंघांवर सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक देखील पाचव्या टप्प्यात आहे. येत्या 20 मे रोजी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडेल. नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीकडून राजभाऊ वाजे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे. महाविकास आघाडीचे वाजे यांच्या प्रचारासाठी संजय राऊत हे नाशिकमध्ये आहेत. मात्र, नाशिकची निवडणूक ही शिंदे आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये असल्यामुळे दोन्ही सेनेच्या नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौर्यावर येत असल्यामुळे संजय राऊत यांनी त्यांच्या दौर्यानिमित्ताने ही शिंदेंची शेवटची फडफड असल्याचं म्हटलं आहे.
संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री आज नाशिकमध्ये पुरवठा करण्यासाठी येत असतील. त्यांनी धनुष्यबाण चोरला आहे. शिंदे-फडणवीस आणि अजितदादांनी टेम्पो भरून पैसे आणून द्या, तरी काही फरक पडत नाही. लोक त्यांना मतदान करणार नाही. पंतप्रधान मोदी देखील ठाण मांडून आहेत. त्याचाही काही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 जागांवर विजय मिळवणार, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. राज्यातील तीनही नेते तन, मन, धनाने काम करत आहे. अजितदादांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपल्या आहेत. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धावपळ सुरू आहे. पण, ही शेवटची फडफड आहे. डॅमेज कंट्रोलसाठी देखील काही राहिले नाही, असे राऊत म्हणाले.
नाशिकमध्ये 800 कोटींचा भूखंड घोटाळा झाला आहे. त्या संदर्भात 14 तारखेला पुराव्यानिशी पत्रकार परिषदेत बोलेन, असे देखील संजय राऊत यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही पदाधिकारी आणि अधिकार्यांचा यात संबंध आहे, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले. जनतेच्या पैशांची लूट सुरू आहे. शेतकरी नसलेल्या बिल्डरांना त्याचे पैसे मिळाले. या घोटाळ्यात शेतकरी कसे बिल्डर झाले, असा देखील सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.







