70 वर्षात मुरुडमध्ये घडली पहिल्यांदाच अशी घटना

। मुरूड जंजिरा । प्रकाश सद्रे ।
अतिवृष्टीमुळे मुरूड जवळील एकदरा गावच्या गायमुख जवळील डोंगराला आडव्या भेगा पडल्याने घबराट पसरली आहे. गाव वसविल्यानंतर 70 वर्षांत अशी घटना प्रथमच घडल्याची माहिती एकदरा गावच्या हनुमान मच्छीमार सोसायटीचे चेअरमन पांडुरंग आगरकर आणि ज्येष्ठ सल्लागार मोतीराम पाटील यांनी दिली. 6 ते 7 ठिकाणी या भेगा पडल्या आहेत.

डोंगरावर वसलेले एकदरा हे गाव 70 वर्षापूर्वी जंजिरा किल्ल्यातील वस्ती हलवून शामराजगड येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. याच गावाला एकदरा असे म्हंटले जाते. येथे कोळी समाजाची अधिकतर वस्ती असून मच्छीमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. या गावच्या पाठीमागे असणार्‍या गायमुख क्षेत्रानजीक असणार्‍या डोंगराला आडव्या भेगा पडल्या असून त्याची खोली 20 फुटापेक्षा आधिक असू शकते, अशी माहिती काही ग्रामस्थांनी दिली. आधिक अतिवृष्टी झाल्यास डोंगरावरील मातीचा ढिगारा सहजगत्या खाली येऊ शकतो.

ही बाजू पाठीमागे असल्याने तूर्तास पुढील नागरी वस्तीस धोका संभवेल असे वाटत नाही. तरीही सुरक्षितता म्हणून काळजी घेतली जात आहे, असे मत पांडुरंग आगरकर आणि मोतीराम पाटील यांनी व्यक्त केले. लोकवस्ती किंवा घरे यामध्ये दोन डोंगरांचे अंतर आहे. मात्र अतिवृष्टीमुळे श्रीराम मंदिराकडे उत्तर दिशेला असलेल्या घरांना जवळील डोंगरातील माती खाली येत असल्याने धोका निर्माण होऊ शकतो.

एकदरा गावच्या पाठीमागील या डोंगर भागात कुठेही लोकवस्ती नाही. दिघी ते राजपुरी समुद्र खाडी समोर हा डोंगर असून गायमुख क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथे अस्थी विसर्जन करण्यासाठी नागरिक, ग्रामस्थ येतात. यापूर्वी कधीही भेगा पडण्याची घटना घडली नव्हती, अशी माहिती पांडुरंग आगरकर, मोतीराम पाटील आणि ग्रामस्थांनी बोलताना दिली. मुळात एकदरा गाव हे ऐतिहासिक काळातील शामराजगड आहे. पुरातत्व विभागाने देखील भागाचे काही वर्षांपूर्वी सर्वेक्षण आणि संशोधन केले होते.

Exit mobile version