‘हे’ आहे ठाकरे सरकार टिकण्याचं कारण

शरद पवारांचं विरोधकांना उत्तर

मुंबई । वृत्तसंस्था ।

बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष टीकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी सरकारमधील तिन्ही पक्षांमधील समन्वयाची जबाबदारी सहा नेत्यांवर असल्याचं सांगितलं आहे व सरकारमध्ये योग्य समनव्य असून अत्यंत व्यवस्थित चाललं असल्याचं सांगत त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

शरद पवारांनी सांगितलं आहे की, “सरकार चालवताना कधीतरी काही प्रश्न निर्माण होतात. असे प्रश्न येतात तेव्हा त्यातून मार्ग काढण्यासाठी एखादी यंत्रणा असावी अशी चर्चा झाली आणि त्यानुसार तिन्ही पक्षांच्या वतीने काही सहकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपवली. यामध्ये काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आहेत. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई व राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील त्यामध्ये आहेत.”

“कोणत्याही महत्वाच्या धोरणात्मक प्रश्नासाठी हे आमचे सहा सहकारी एकत्र बसतात आणि त्यासंबंधी निर्णय घेतात. त्यामुळे सरकार अत्यंत व्यवस्थित चाललं आहे. आणि याच पद्धतीने जाण्याची भूमिका सर्वांची असल्याने सरकार पाच वर्ष टीकेल याबाबत शंका नाही,” अशी खात्री शरद पवारांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version