यंदाचा हंगाम पृथ्वीची कारकीर्द ठरवेल

अनिल कुंबळेने दिल्या कानपिचक्या


| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

दिल्ली कॅपिटल्सने सलामीवीर आणि सतत वादाच्या भोवऱ्यात अडकणारा पृथ्वी शॉचा मागील हंगाम वाईट गेला आहे. परंतु, दिल्लीने त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत संघात कायम ठेवले आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम हा त्याच्यासाठी पुनरागमनाचा किंवा कारकीर्द संपवणारा ठरू शकतो, असे विधान भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वी शॉबद्दल केले आहे.

तो म्हणाला, ‌‘पृथ्वी शॉला हे कळायला हवं की त्याच्यासोबत खेळलेले खेळाडू हे खूप पुढे निघून गेले आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर शुभमन गिल! तो भारताच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक झाला आहे. संघ व्यवस्थापन त्याचा दीर्घकाळासाठी विचार करत आहे. पृथ्वी शॉने मात्र ही संधी गमावली. शॉला त्याच्या तंदुरुस्तीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्या तंदुरुस्तीबाबत कायम चर्चा होते. त्याच्या क्रिकेटिंग क्षमतेबद्दल कोणी बोलताना दिसत नाही. त्याच्याकडे विस्फोटक फलंदाजी करण्याची क्षमता आहे. तो एकहाती सामना फिरवण्याची क्षमता ठेवतो. तो तरूण आहे, मात्र त्याने त्याच्या तंदुरुस्तीवर काम केलं पाहिजे. जर सौरव गांगुली, डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग त्याला तंदुरुस्तीकडे लक्ष देण्यास भाग पाडू शकत नसतील, तर ही खूप मोठी समस्या आहे.

Exit mobile version