हे यश आत्मविश्वास वाढवणारः सुर्यकुमार यादव

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका 2-1 ने जिंकली. त्यामुळे आगामी टी-20 विश्वचषकासाठी हे यश आत्मविश्वास वाढवणारे ठरले आहे. यादरम्यान, कर्णधार सूर्यकुमार यादवने गोलंदाजांचे देखील कौतुक केले आहे.

भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर टी-20 मालिकेत मात्र दमदार खेळ केला आणि मालिकाही जिंकली. शनिवारी (दि.9) पार पडलेला पाचवा टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र, भारतीय संघ मालिकेत 2-1 फरकाने आघाडीवर असल्याने मालिकाही जिंकली. या मालिकेत पहिला सामनाही पावसामुळे रद्द झाला होता. पाचवा सामना रद्द झाल्यानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, दुसऱ्या सामन्यात पराभूत झाल्यामुळे आम्ही 0-1 असे पिछाडीवर पडलो होतो, त्यानंतर ऑस्ट्रेलियात मालिका जिंकणे गौरवास्पद आहे. तसेच, यशाचे खरे श्रेय हे गोलंदाजांचे आहे. बुमरा आणि अर्शदीप आणि त्यानंतर फिरकी गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली, त्यामुळे दोन सामने जिंकता आले. तयार केलेल्या डावपेचांनुसार सर्वच गोलंदाजांनी मारा केला, असे सूर्यकूमार म्हणाला. आता काही महिन्यांत होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी दोन-तीन मालिका खेळणार आहोत. त्यासाठी उत्तम तयारी करता येईल. ऑस्ट्रेलियातील हे यश आत्मविश्वास वाढवणारे आहे.

Exit mobile version