नात्यात विरघळणार प्रेमाचा गोडवा; व्हॅलेंटाईन डेला केकला मागणी
| पाली/ वाघोशी | प्रतिनिधी |
प्रेम व्यक्त करण्याचा सण अर्थात व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने बाजारात भेटवस्तूंची रेलचेल असली, तरी यंदा सेलिब्रेशनसाठी केकला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. विशेषतः तरुण व जोडप्यांसाठी डिझाइन केलेले बेंटो केक आणि हार्ट शेप केकना मोठी मागणी असून, बेकरी व्यावसायिकांकडे ऑर्डरचा ओघ वाढला आहे.
केवळ दोघांसाठी पुरेसा असणारा छोटा पण आकर्षक बेंटो केक यंदा आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. या सोबतच, सिक्रेट मेसेज केक ही नवीन संकल्पना प्रेमी युगुलांमध्ये लोकप्रिय झाली आहे. या केकवर वरून काहीही दिसत नसले तरी, केक कापल्यावर किंवा त्यातील विशिष्ट भाग बाजूला केल्यावर आत लपवलेला प्रेमसंदेश समोर येतो. केवळ केकच नाही, तर त्यासोबत येणाऱ्या इवल्याशा संदेशांनी नात्यातील गोडवा वाढवण्याचा प्रयत्न सध्या तरुण पिढी करताना दिसत आहे.
शुद्ध साहित्य आणि वैयक्तिक आवडीनुसार सजावट मिळत असल्याने ग्राहक होम बेकर्सकडे वळत आहेत. तसेच सर्वच केकची दुकाने आता विविध केकने सजली आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या दरम्यान येणाऱ्या विविध दिवसांमध्ये देखील केक घेतले जात आहेत. या दुकानातून विविध ऑफर्स सुद्धा दिल्या जात आहेत. विविध प्रकारे ही दुकाने सजलीदेखील आहेत.
भेटकार्ड व टेडी बेअरची जागा केकने घेतली
हे केक वजनाने हलके आणि दिसायला क्युट असल्याने प्रवासात नेण्यासाठी किंवा छोट्या सेलिब्रेशनसाठी सोयीचे आहेत. पूर्वी केवळ भेटकार्ड, चॉकलेट किंवा टेडी बेअर दिले जायचे, आता त्याची जागा ‘कस्टमाइज्ड केक'ने घेतली आहे. तसेच लाल गुलाब आणि चॉकलेट हार्ट्सनी सजवलेल्या हार्ट शेप डिझाईन केक्सना आजही तितकीच मागणी.
व्हॅलेंटाइन डे निमित्त हार्ट शेप आणि लाल रंगाच्या केक्सना नेहमीच पसंती असते. मात्र, यंदा बेंटो केकसाठी मोठ्या प्रमाणावर आगाऊ नोंदणी झाली आहे. आमच्याकडे अनेक ऑर्डर्स आधीच बुक झाल्या आहेत, तरीही काही ग्राहक ऐनवेळी येऊनही केक्सची मागणी करतात. यंदा सिक्रेट मेसेज केकची क्रेझ जास्त असून, प्रेमी युगुलांना आपल्या जोडीदाराला सरप्राईज देण्यासाठी हे केक हवे आहेत.
-निवेदिता भावे,
संचालिका, डॉ टेल






